ओव्हरलोड ट्रकची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:07 PM2018-04-05T22:07:29+5:302018-04-05T22:07:29+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदार अवैध खणन करून रस्त्याच्या बांधकामात ओव्हरलोड ट्रकद्वारा पिवळी मातीचा वापर करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदार अवैध खणन करून रस्त्याच्या बांधकामात ओव्हरलोड ट्रकद्वारा पिवळी मातीचा वापर करीत आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणताच उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे या प्रकरणाची गंभीर दखल घेत, कंत्राटदाराच्या ट्रकची वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले तसेच खणनसुद्धा बंद करण्यात आले आहे.
परतवाडा ते मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर होत आहे. ही माती मौजे पिंपळखुटा भागातील ई-क्लास जमीन खोदून काढली जात आहे. या भागात कंत्राटदार एचजी इन्फ्रा कंपनीतर्फे ३० ते ४० फूट खोल खोदण्यात आले आहे. त्यांच्याच आठ मोठ्या ट्रकमध्ये ६-७ ब्रास माती भरून वाहतूक करीत असल्याचे सत्य ‘लोकमत’ने उघडकीस आणले.
यामध्ये कंत्राटदारतर्फे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या परवानगीच्या संशयास्पद रॉयल्टी पासवर दररोज शेकडो ब्रास गौण खनिजाचे खणन सुरू होते. ही बाब गंभीरतेने घेत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने कंत्राटदाराला उत्खनन बंद करण्याचे निर्देश देऊन ट्रकची वाहतूकसुद्धा बंंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
खड्डे बुजविण्यास सुरुवात
सदर प्रतिनिधीने उत्खननस्थळी भेट घेतली असता, खणन बंद करून लेव्हल मशीनद्वारे या जागेतील खड्डे बुजविणे सुरू होते. कंत्राटदाराचे चार जेसीबी व सात ट्रक उभेच असल्याने महसूल विभाग वेळाने का होईना, खडबडून जागे झाले, हे निश्चित. मातीने भरलेल्या ट्रकची वाहतूक बंद झाल्याने कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने त्रस्त नागरिकांना गुुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे.