राष्ट्रीय महामार्गावर कन्हान रेतीची ओव्हरलोड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:41+5:302021-08-12T04:16:41+5:30
कारवाई केव्हा? आशीर्वाद कोणाचा? सूरज दाहाट - तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ हा अवैध वाहतुकीसाठी मोकळा झाला ...
कारवाई केव्हा? आशीर्वाद कोणाचा?
सूरज दाहाट - तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ हा अवैध वाहतुकीसाठी मोकळा झाला की काय, असा प्रश्न तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज धावणाऱ्या कन्हान रेतीच्या शेकडो ओव्हरलोड ट्रकमुळे उपस्थित झाला आहे. स्थानिक रेती माफियांवर राजकीय कनेेक्शनमुळे कारवाई होत नाही. यात महसूलला मात्र लाखो रुपयांचा चुना लागत आहे.
वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक भार असल्यास नियमानुसार दंड केला जातो. मात्र, या नियमाला वाळू माफियांकडून तिलांजली देऊन राष्ट्रीय महामार्गवरून ओव्हरलोड वाळूची वाहतूक खुलेआम सुरू असून, याकडे पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग का दुर्लक्ष करीत आहे, हादेखील सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. तिवसा व मोझरी येथील कन्हान रेतीचे व्यावसायिक असून, त्यांचे राजकीय लोकांशी जवळीक संबंध असल्याने कारवाई होत नाही, अशी खमंग चर्चा तालुक्यात आहे.
खरे तर तिवसा पोलीस व महसूल विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, हे दोन्ही विभाग कारवाई करत नाही म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करतात. मात्र, मोठी कारवाई होत नाही. राष्ट्रीय महामार्ग हा अवैध वाहतुकीसाठी मोकळा सोडण्यात आला आहे का, असा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे आता नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी कारवाई करून या कन्हान माफियांच्या मुसक्या आवळून शासनाचा बुडत असलेला महसूल वाचवण्याची गरज आहे.
-------------------