आचारसंहितेनंतर 'व्हिजन डाक्युमेंट'चे अवलोकन !
By Admin | Published: February 1, 2017 12:10 AM2017-02-01T00:10:29+5:302017-02-01T00:10:29+5:30
राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
८३९ ग्रामपंचायतींचा समावेश : ग्रामविकासाला मिळणार गती
अमरावती : राज्य शासनामार्फत सुरू केलेल्या 'आमचं गाव आमचा विकास' या हितकारक योजनेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहेत. जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींचे 'व्हिजन डाक्युमेंट' अवलोकनार्थ जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने गाव विकासाला चालना मिळणार आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली पंचायत समिती कार्यालय आदी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था व या प्रणालीतील सर्व प्रशासकीय अधिकारी एकत्रितरीत्या जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींमध्ये 'आपलं गाव आपला विकास' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन दिवस विविध उपक्रम राबवून विकासाचा नियोजन आराखडा तयार करून पंचायत समितीकडे पाठविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात तीन दिवसांचा सूक्ष्म नियोजन कार्यक्रम राबविण्यात आला असून आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पशुसंवर्धन आदींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पशुधन पर्यवेक्षक, आशा वर्कर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, युवक-युवती गट, ग्रामसेवक, तलाठी, बचतगटातील सदस्य, अध्यक्ष, कृषी सहायक, जलसुरक्षारक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, वनपाल, स्वयंसेवक, ग्रामपंचायत सेवक आदींसह ग्रामपंचायतींच्या सर्व समित्यांचे सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
तांत्रिक समितीने केली आराखड्याची तपासणी
आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत २२ जुलै ते १४ आॅगस्टदरम्यान गावाचा विकास आराखडा सादर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात गावाचा विकास आराखड्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायती प्रारूप आराखडे तयार करण्यासाठी बैठका, चर्चासत्र, दिंडी, मशालफेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीकडे सादर केलेल्या आराखड्यांची तांत्रिक समितीकडे तपासणी करून सदर आराखडे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. सादर आराखडे अवलोकनार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाणार आहे. नियोजनानुसार संबंधित गावांमधील विविध विकासकामे सुरू होणार आहेत.
दृष्टिक्षेपात तालुकानिहाय ग्रामपंचायती
जिल्हाभरातील १४ तालुक्यांतर्गत एकू ण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती ५९, अंजनगाव सुर्जी ४९, भातकुली ४८, चिखलदरा ५३, धारणी ६२, दर्यापूर ७४, नांदगाव खंडेश्र्वर ६८, चांदूरबाजार ६७, चांदूररेल्वे ४९, अचलपूर ७०, तिवसा ४५, मोशी ६७, वरूड ६६, धामणगाव रेल्वे ६२ आदी ग्रामपंचातींचा समावेश आहे.