स्वत:चे घर, दुकान, चारचाकी अन् शेती; तरीही हवे घरकुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 02:14 PM2021-12-01T14:14:53+5:302021-12-01T15:26:32+5:30
स्वतःचे दुकान, चारचाकी वाहन, शेतजमीन आदी सुविधा उपलब्ध असूनही काहींनी घरकुलासाठी अर्ज केले. अशातच ११ हजार ७९० घरकुलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे तूर्तास बाद ठरले आहेत. निकषानुसार पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
अमरावती : पंतप्रधान आवास योजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला १ लाख ४ हजार १७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ८० हजार ९८६ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी स्वतःचे घर, दुकान, चारचाकी वाहन आणि शेती असूनही घरकुलासाठी केलेले ११ हजार ७९० ठेवण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत पंतप्रधान आवास योजना घरकुल योजना राबविल्या जातात. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४ हजार १७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ८० हजार ९८६ अर्ज करण्यात आले. त्यामध्ये स्वतःचे दुकान, चारचाकी वाहन, शेतजमीन आदी सुविधा उपलब्ध असूनही काहींनी घरकुलासाठी अर्ज केले. अशातच ११ हजार ७९० घरकुलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे तूर्तास बाद ठरले आहेत. निकषानुसार पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
ग्रामसभा म्हणेल तो बेघर
घरकुलासाठी लाभार्थींची निवड ग्रामसभेत केली जाते. त्यासाठी लाभार्थी यादीचे वाचन ग्रामसभेत करण्यात येते व त्यानंतर घरकुलासाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यात येते. यामध्ये बेघर आणि मातीचे कच्चे घर असलेल्या लाभार्थींना घरकुल यादी पात्र करण्यात येते.
घरकुलासाठी २२ निकष
घरकुलासाठी लाभार्थी बेघर असावा किंवा मातीचे घर असावे. घरकुलाच्या लाभासाठी लाभार्थींकडून दोन खोल्यांपेक्षा जास्त खोल्यांचे घर नसावे. पक्क्या भिंतीचे घर नसावे. लाभार्थींकडे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने नसावे. तीनचाकी व चारचाकी कृषियंत्र नसावे. ५० हजार रुपये अधिक रकमेचे किसान क्रेडिट कार्ड नसावे. लाभार्थींच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे दरमहा १० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असावे. साडेसात एकरापेक्षा जास्त कोरडवाहू आणि अडीच एकरापेक्षा ओलिताखाली शेती नसावी आदी प्रकारच्या २२ निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्याला १ लाख ४ हजार १७ उद्दिष्ट असून, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ८० हजार ९८६ व्यक्तींची नोंदणी केली आहे. त्यापैकी ६९ हजार १९६ अर्ज मंजूर झाले आहेत, तर ५१ हजार ६९६ घरकुल पूर्ण झाले आहेत. उद्दिष्ट जास्त आहे. लाभार्थींकडे जागाची अडचणी होती. अशा लाभार्थींना जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. जास्तीत जास्त घरकुले पूर्ण केले जातील.
- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
घरकुल बांधणीचे उद्दिष्ट १ लाख ४ हजार १७
आलेले अर्ज - ८०९८६
बाद झालेले अर्ज - ११७९०