घर सुना सुना लागे.....कोरोना संकटात भाडेकरूंचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:09 PM2021-05-04T16:09:55+5:302021-05-04T16:10:18+5:30
Amravati news काही महिन्यांपूर्वी ज्या परिसरात भाड्याने खोली मिळवणे कठीण जात होते, अशा विविध भागांमध्ये आज शेकडोंच्या संख्येने रिकाम्या खोल्या दिसताहेत. या भाड्याचा खोल्या रिकाम्या दिसत असल्याने ‘घर सुना सुना लगे...’ असे म्हणण्याची पाळी घरमालकांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने हजारो परप्रांतीय गतवर्षीप्रमाणे गावाकडे परत निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी ज्या परिसरात भाड्याने खोली मिळवणे कठीण जात होते, अशा विविध भागांमध्ये आज शेकडोंच्या संख्येने रिकाम्या खोल्या दिसताहेत. या भाड्याचा खोल्या रिकाम्या दिसत असल्याने ‘घर सुना सुना लगे...’ असे म्हणण्याची पाळी घरमालकांवर आली आहे.
शहरातील गल्लोगल्ली घरावर ‘भाड्याने खोली मिळेल’ अशा पाट्या लागल्या दिसत होत्या. मात्र, कोरोनाचे संकट पाहता, अनेक भाडेकरूंनी आपल्या खोल्या खाली केल्या आहेत. परिणामी घरमालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहराकडे जावे लागते. त्यांच्याकडून मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतून घरमालकांना ही वेगळी मिळकत होत होती. त्यासाठी तर अनेकांनी कर्ज घेऊन मजले चढवले. परंतु, कोरोनाने ही सगळी गणिते बिघडवून टाकली आहेत. कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण व घरखर्च या ताळमेळ कसा लागणार, असे अनेक प्रश्न या लोकांपुढे आता उभे राहिलेले आहेत.
शहरात महाविद्यालये, रेल्वे स्थानक तसेच तालुका मुख्यालयाची महत्त्वाची सर्व कार्यालये आहेत. मात्र, लॉकडाऊन दरम्यान शासनाने आपापल्या गावी परत जाण्यासाठी कायदेशीर तरतुदी पूर्ण करून परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही दिवसांत बरेच भाडेकरू आपापल्या गावी परतले. परिणामी शेकडो खोल्या रिकाम्या झाल्या आहेत.
स्वस्तात जागा खरेदी करून त्यावर खासगी बँक किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून अनेकांनी घरे बांधली. घराचे बांधकाम करतेवेळी खोल्या भाड्याने देता येतील, अशा प्रकारे हे बांधकामसुद्धा करण्यात आले. भाड्यातून बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे शक्य होते. याच घरभाडे कमाईतून बाहेरगावी शिक्षणासाठी असणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्च व घरखर्च आदी भागवला जातो. मात्र अचानक उद्भवलेल्या कोरोनाचा या संकटामुळे अनेकांची घरे रिकामी झाली आहेत. आता पुन्हा भाडेकरूंचा शोध घेतला जात आहे.