ऑक्सिजन पार्क अमरावतीसाठी भूषणावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:33+5:302021-07-25T04:12:33+5:30

ना. यशोमती ठाकूर, रुक्ष जागेचे देखण्या उद्यानात रूपांतर, जैवविविधता संवर्धनाचा आदर्श अमरावती : युनायटेड नेशन्सने चालू दशक हे जैवविविधता ...

Oxygen Park for Amravati | ऑक्सिजन पार्क अमरावतीसाठी भूषणावह

ऑक्सिजन पार्क अमरावतीसाठी भूषणावह

googlenewsNext

ना. यशोमती ठाकूर, रुक्ष जागेचे देखण्या उद्यानात रूपांतर, जैवविविधता संवर्धनाचा आदर्श

अमरावती : युनायटेड नेशन्सने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रुपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी येथे केले.

जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सामाजिक वनसंरक्षक डी. पी. निकम, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, हरिभाऊ माेहोड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र तिथे झाडे नसल्याने रुक्ष झाले होते. डम्पिंग ग्राऊंडसारखा त्याचा वापर होत होता. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांलगतच्या मोकळ्या वनजमिनींवर अशी वनोद्याने निर्माण करण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

------------------

सावली व प्राणवायू देणा-या झाडांचे उपवन

ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात.ऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे.

--------------------

बालकांसाठी स्वतंत्र उद्यान

बालगोपालांसाठी स्वतंत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, तिथे विविध खेळणीही उपलब्ध आहेत. पार्कच्या सर्व क्षेत्राचे निरीक्षण करता यावे, यासाठी निरीक्षण मनोराही (बूट) उभारण्यात आला आहे. कॅक्टसच्या विविध प्रजातींची लागवड करून कॅक्टस, कमळ व रॉक गार्डनही उभारण्यात आले आहे. वन्यप्राणी व पक्ष्यांची छायाचित्रे असलेले माहितीफलकही उद्यानात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

Web Title: Oxygen Park for Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.