ऑक्सिजन पार्कचे शुल्क कमी असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:16+5:302021-08-14T04:17:16+5:30
अमरावती : वनविभागाने ऑक्सिजन पार्कचे वाढविलेले शुल्क कमी करावे, या आशयाचे पत्र माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी वनाधिकाऱ्यांना दिले ...
अमरावती : वनविभागाने ऑक्सिजन पार्कचे वाढविलेले शुल्क कमी करावे, या आशयाचे पत्र माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी वनाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रौढ व्यक्ती ३० रुपये तर लहान मुलांकरिता २० रुपये शुल्क अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
वनविभागाने ऑक्सिजन पार्कमध्ये प्रवेशासाठी आकारलेले दर भरमसाठ आहे. ऑक्सिजन पार्क उभराणीसाठी निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. केवळ देखभाल, दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारणे सयुक्तिक नाही, असा आक्षेप सुनील देशमुख यांनी घेतला आहे. उकीरड्याचे स्वरूप प्राप्त झालेल्या जागेचे ऑक्सिजन पार्कच्या रूपात नंदनवन झाले आहे. ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीमध्ये वनविभागावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा आलेला नाही. तरीही अवाजवी शुल्क कशासाठी, असा सवाल सुनील देशमुख यांनी उपस्थित केला. सुरक्षेच्या नावाखाली भरमसाठ प्रवेश शुल्क आकारायचे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कायम सेवेत असलेले व कंत्राटी पद्धतीने ठेवलेले वनमजूर अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर घरगुती कामे, साफसफाई, स्वयंपाक, मुलांना फिरवणे, पाळीव कुत्र्यांना फिरवणे या सेवेसाठी दिमतीला द्यायचे, असा प्रकार सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी जनभावनेचा आदर ठेऊन ऑक्सिजन पार्कचे वाढीव शुल्क कमी करावे, असे पत्राद्वारे सुनील देशमुख यांनी वनविभागाला निर्देशित केले आहे.