ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती, खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:24+5:302021-04-22T04:12:24+5:30
अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी रेमडेसिविर, ऑक्सिजन व इतर साधनसामग्रीसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत. ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती व ...
अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी रेमडेसिविर, ऑक्सिजन व इतर साधनसामग्रीसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत. ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याला नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी केले.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संचारबंदी निर्बंध अधिक कडक केले आहेत. नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करून त्यांना सुखरूप ठेवणे, याला सध्या सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे या नियमांचे कसोशीने पालन करावे. आपला बेशिस्तपणा हा दुसऱ्याचा जीव धोक्यात आणू शकतो, याचे भान ठेवावे. अनेकदा नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतात, कारवाई करावी लागते, नागरिकांच्या संरक्षणासाठी तसे निर्णय घेतले जातात. त्याला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या काळात कोरोना उपचारांत आवश्यक साधनसामग्रीसाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया राबविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
‘पॅनिक’ नको, पण दक्षता घ्या’, जिल्हाधिकारी
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदीत आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांटसाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही या काळात संयम व स्वयंशिस्त पाळावी. कोरोना झाल्यास तो योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे कुठेही पॅनिक निर्माण होऊ नये. सर्वांनी काटेकोरपणे दक्षता पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.