ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 05:00 AM2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:58+5:30

कोरोनावर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी ठरत असल्याने गंभीर रुग्णांचा पाच इंजेक्शनचा कोर्स केला जातो. दररोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी असताना चार दिवसांपूर्वी जिल्ह्याकरिता ७०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्याच दिवशी संपले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या डोससाठी इंजेक्शन कुठून आणावे, असा गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांसमोर प्रश्न निर्माण झाला. 

Oxygen, remedivirus also waiting! | ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेटिंगवर!

ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेटिंगवर!

Next
ठळक मुद्देअपुऱ्या पुरवठ्यामुळे यंत्रणा हतबल, ऑक्सिजनसाठी प्रशासनाची कसरत, इन्जेक्शनचाही साठा संपला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर सद्यस्थितीत ठणठणाट व ऑक्सिजनचा जेमतेमच साठा आहे.  यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील १०० हून अधिक केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कोरोनाशी कसे लढणार, असा नागरिकांचा सवाल आहे.
कोरोनावर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी ठरत असल्याने गंभीर रुग्णांचा पाच इंजेक्शनचा कोर्स केला जातो. दररोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी असताना चार दिवसांपूर्वी जिल्ह्याकरिता ७०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्याच दिवशी संपले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या डोससाठी इंजेक्शन कुठून आणावे, असा गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांसमोर प्रश्न निर्माण झाला. 
ऑक्सिजनचा पुरवठाही जेमतेम होत आहे. अद्याप कमी पडला नसला तरीही पुरेसा नाही. ही यंत्रणांची खंत आहे. यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम लक्ष देऊन आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने शासकीय अन् खासगी रुग्णालयांत बेडचा तुटवडा अलीकडे जाणतो आहे.
कोरोना प्रतिबंधात लसीकरण महत्त्वाचे आहे. सुरुवातीला लसीचा साठा भरपूर होता, मात्र, लसीकरणाचे आणखी दोन टप्पे वाढविले असताना मागणीच्या तुलनेत डोजचा पुरवठा होत नाही. 
जिल्ह्यातील १२५ पैकी ७० केंद्र बंद आहेत. रविवारी आणखी ३० ते ४० केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे.
 

रेमडेसिविरचा पुरवठाच नाही, वाटपाचे केंद्रही बंद
जिल्ह्यात दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी रोज होत आहे. त्यातुलनेत एका आठवड्यात फक्त १४५० व्हायल जिल्ह्याला मिळाले. व्यावसायिकांनी ३० लाखांची  आगाऊ रक्कम डेपोकडे जमा केलेला असताना अद्याप पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पीडीएमएमसीतील केंद्रात मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.
पुढे काय? शनिवारी पीडीएमएमसी केंद्रात ४५० इंजेक्शन उपलब्ध झाले. याशिवाय आवश्यक व्हायल पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

सुपर स्पेशालिटीला रोज लागतो ४.५ टन ऑक्सिजन
येथील सुपरस्पेशालिटीमधील जिल्हा कोविड रुग्णालयात रोज चार टन ऑक्सिजन लागतो. शनिवारी ४.११ टन ऑक्सिजन उपलब्ध होता. येथे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रोज लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने अद्याप तरी टंचाई नसली तरी सध्या असणारा पुरवठा जेमतेमच असल्याची स्थिती आहे.
पुढे काय : शासकीय रुग्णालयात सध्या तरी पुरेसा साठा होत असला तरी हे रुग्णालय पुरवठादारावरच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील १०० लसीकरण केंद्र साठ्या अभावी बंद
जिल्ह्यात शनिवारी कोव्हॅक्सिनचे चार हजार डोज शिल्लक होते. याचा दिवसभर वापर झाल्यानंतर हा साठा संपणार आहे. कोविशिल्डचा साठा चार दिवसांपूर्वीच संपुष्टात आला. त्यामुळे जिल्ह्यातील १०० हू अधिक केंद्रे रविवारपासून बंद राहतील. जिल्ह्यात लस महोत्सवाची वाट लागली आहे.
पुढे काय : जिल्ह्यात चार ते पाच हजार कोव्हॅक्सिनचे डोज प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे २५ केंद्रे सुरू राहतील.

जिल्ह्यात लसीचे डोस उपलब्ध नसल्यामुळे सर्व लसीकरण केंद्र रविवारपासून बंद राहण्याची शक्यता आहे. याशिवाय रेमडेसिविरचा साठा सरप्लस नाही. प्रोटोकॉलनुसार रुग्णांना पाहिजे तेवढा साठा उपलब्ध आहे. याशिवाय ऑक्सिजनचा साठादेखील पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध आहे. 
- शैलेश नवाल
 जिल्हाधिकारी

 

Web Title: Oxygen, remedivirus also waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.