नदीपात्रात जेसीबीने पांदण रस्ता
By Admin | Published: July 2, 2017 12:16 AM2017-07-02T00:16:35+5:302017-07-02T00:16:35+5:30
नजीकच्या मल्हारा परिसरातून वाहणाऱ्या बिच्छन नदीपात्रात कंत्राटदाराने स्वमर्जीनेच जेसीबीच्या सहाय्याने पांदण रस्त्याचे काम सुरू केले.
अधिकारी अनभिज्ञ : संतप्त गावकऱ्यांनी बंद पाडले काम
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : नजीकच्या मल्हारा परिसरातून वाहणाऱ्या बिच्छन नदीपात्रात कंत्राटदाराने स्वमर्जीनेच जेसीबीच्या सहाय्याने पांदण रस्त्याचे काम सुरू केले. यावर संतप्त नागरिकांनी आक्षेप घेत शुक्रवारी काम बंद पाडले. या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासनातर्फे कुठलेच आदेश देण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे.
बिच्छन नदी मल्हारा, म्हसोना, गौरखेडा मार्गे परतवाडा-अचलपूर शहरातून वाहते. परिसरातील मोठी नदी म्हणून बिच्छन नदीची ओळख आहे. काही ठिकाणी अरूंद पात्र आहेत. या नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक खरडूून जात असल्याची व्यथा आहे. असे असताना मल्हारा गावानजीकच्या पात्रात परतवाडा येथील रोशन मातकर नामक कंत्राटदाराने प्रशासनाचे कुठलेच आदेश नसताना स्वत:हून जेसीबीने नदीपात्रातून आडव्या पांदण रस्त्याचे काम केले. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अडविण्याचे कृत्य करण्यात आल्यावर संभाव्य मोठे नुकसान पाहता गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
शेतकरी म्हणतात, पुराचे पाणी शेतात शिरणार..
मल्हारा परिसरात बिच्छन नदीचे पात्र अरूंद आहे. दरवर्षी आमच्या शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशात मध्यभागातून पांदण रस्त्याचे काम जेसीबीने केले जात आहे. त्यामुळे पुरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पांदण रस्ता रद्द करून बिच्छन नदीपात्र दोनशे मीटर लांबीपर्यंत खोलीकरण करून देण्यात यावे व नुकसान होण्यापासून बचाव करण्याची मागणी तहसीलदार निर्भय जैन यांना एका पत्राद्वारे शंकरराव बिडकर, केशव काळे, एस. एस. दास, अरुण सदांशिव, राजू गोरे, दीपक जाधव, मनोज बोरेकार आदींनी केली आहे.
मग्रारोहयोत २४ लाखांचा रस्ता
बिच्छन नदीपात्रात मातकर नामक कंत्राटदाराने पांदण रस्त्याचे मातीकाम कुणाच्या आदेशावरून केले त्याची प्रशासनाजवळ नोंद नसल्याने अधिकारी खुद्द अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने माहिती घेतल्यावर उघडकीस आले. मात्र नदीपात्र अडविणारा हा रस्ता मग्रारोहयोअंतर्गत जवळपास २४ लक्ष रूपये खर्चून तयार केला जाणार असल्याची मंजुरी देण्यात आली आहे. मुरूम ब्लॅकेटिंग करण्याचे काम मंजूर असून त्यापूर्वी आवश्यक असलेले मातीकाम लोकसहभागातून करण्याचा नियम आहे. परंतु या मातीकामासाठी कुठल्याच प्रकारची लोकवर्गणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली नाही. स्वत:च्या मर्जीने कंत्राटदाराने जेसीबी लावून नदीपात्र खोदून प्रवाह अडविला, हे विशेष.
सा. बां. विभागाला मग्रारोहयोअंतर्गत मल्हारा पांदण रस्त्यावर मुरूम ब्लॅकेटिंग कामाचे पत्र आले. परंतु कुठल्याच कंत्राटदाराला मातीकाम करण्याचे सांगण्यात आले नाही. त्यासंदर्भात कुठलीच माहिती नाही.
- प्रमोद भिलपवार, उपविभागीय अभियंता
सा.बां. विभाग, अचलपूर