संस्कार भारतीचे ‘पाडवा पहाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:38 PM2018-03-18T22:38:34+5:302018-03-18T22:38:34+5:30
येथील ‘संस्कार भारती’ च्या वतीने पाडवा पहाट अलोट गर्दीच्या साक्षीने रविवारी पार पडला. शंभरावर तरुण कलावंतांनी नृत्य, नाट्य, संगीत, रांगोळी आणि चित्रकला या कलाप्रकारांच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरण करून अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील ‘संस्कार भारती’ च्या वतीने पाडवा पहाट अलोट गर्दीच्या साक्षीने रविवारी पार पडला. शंभरावर तरुण कलावंतांनी नृत्य, नाट्य, संगीत, रांगोळी आणि चित्रकला या कलाप्रकारांच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरण करून अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.
स्थानिक व्यंकटेश लॉनवर गुढीपाडव्याला राबवल्या जाणाऱ्या ‘पाडवा पहाट’ या उपक्रमाचे यंदाचे १७ वर्ष होते. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत संघटनमंत्री अजय देशपांडे, उपाध्यक्ष मोहन गंगवाणी, कोषाध्यक्ष अनघा मोहरील, संस्कार भारती शाखेच्या अध्यक्ष जयश्री वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीचे पूजन करण्यात आले.
विश्वविजयी अलेक्झांडरच्या स्वारीला चाणक्य, चंद्रगुप्त यांनी समर्थ उत्तर देऊन त्याला भारतातून पळण्यास बाध्य केले. विजय नगरचे साम्राज्य व कृष्णदेवरायांचा पराक्रम, सिंध प्रांताचा राजा दाहीरसेन, थोरला बाजीराव पेशवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, राणी पद्मावती, १८५७ चे स्वातंत्र्य समर आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्य असा इतिहासातील सोनेरी पानांचा आढावा रविवारच्या पाडवा पहाट मध्ये घेण्यात आला. संस्कार भारतीच्या ‘साधयती संस्कार भारती भारते नवजीवनम’ या ध्येय गीताने प्रारंभ तर वंदे मातरमने समारोप झाला. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला या शिवराज्याभिषेकाच्या गीताने व प्रसंगाने विशेष दाद घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन शिवराय कुळकर्णी व अश्विनी पारळकर यांनी केले.
अजित वडवेकर, विशाल तराळ आणि प्रसाद खरे यांनी नाट्य दिग्दर्शन तर जयश्री वैष्णव यांनी संगीताचे दिग्दर्शन केले.रसिका कौंडण्यने वाळूचा वापर करून महापुरुषांच्या प्रतिमा साकारल्या होत्या.