‘त्या’ पानटपरीवर अद्यापही गुंडांचा वावर
By admin | Published: September 29, 2016 12:06 AM2016-09-29T00:06:20+5:302016-09-29T00:06:20+5:30
येथील वाघ्र प्रकल्प कार्यालयानजीकच्या एका गल्लीत वाईन शॉपीसमोर असलेल्या पानटपरीवरच गावगुंडांचे टोळके उभे राहाते.
खुलेआम धुम्रपान : बंदीनंतरही मिळतो गुटखा, पोेलिसांनी गस्त वाढवावी
अमरावती : येथील वाघ्र प्रकल्प कार्यालयानजीकच्या एका गल्लीत वाईन शॉपीसमोर असलेल्या पानटपरीवरच गावगुंडांचे टोळके उभे राहाते. राज्यात गुटखाबंदी असतानाही या पानटपरीवर खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानबंदी असतानाही अनेक गुंड व ईतर युवकही येथे तासनतास बसून सिगारेटचा धूर सोडत असल्याचे चित्र या पानटपरीवर दिसून येते.
याठिकाणी भांबरे यांचे ‘वाईनशॉप’ आहे. येथून अनेक मद्यपी दारु विकत घेतात आणि या पानटपरीलगतच्या महापालिकेच्या फुटपाथवर अंधारात उभे राहून येथेच दारु ढोसतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न लोकमतने लोकदरबारात मांडताच गाडगेनगर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनावर बंदी असताना देखील हे युवक खुलेआम मद्यप्राशान करताना पोलिसांना आढळले. मात्र, त्यानंतरही येथील हा गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नसल्याने यापरिसरात सांयकाळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक पुंडकर यांनी वाईन शॉपीच्या संचालकांना त्वरीत सुरक्षा गार्ड ठेवण्याची तंबी दिली आहे. परंतु याठिकाणी अद्यापही सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही. गांवगुंडांच्या भीतीमुळे परिसरातील तरूणी व महिलांनी दारू दुकानाच्या गल्लीतून ये-जा देखील बंद केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेने येथे तातडीने पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या गावगुंडांवर तातडीने अंकुश लावण्याची मागणी आहे.
पोलिसांच्या आदेशाचे दोनच दिवस पालन
येथील सार्वजनिक बांधकाम विभागालगत वनविभागाच्या वाघ्र प्रकल्प कार्यालयासमोरील क्लासिक कमर्शिअल कॉम्पलेक्समधील दारु दुकानाजवळ असलेल्या पानपरीवर गुटखाविक्री करण्यात येत आहे. दारुचे पार्सल गांवगुडांनी विकत घेतले की रात्री उशिरापर्यंत येथील पानटपरीवरच त्यांचा तासन्तास ठिय्या असतो. त्यामुळे या परिसरात रात्री पानटपरी बंद ठेवावी, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले असता सोमवारी व मंगळवारे असे दोनच दिवस ही पानटपरी बंद ठेवण्यात आली. परंतु बुधवारी पुन्हा ही पानटपरी सुरू आढळली. त्यामुळे याबाबत पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.