इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:55 PM2023-01-24T16:55:03+5:302023-01-24T16:57:40+5:30
शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेला शेतकऱ्यांच्या कापूस आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलनादरम्यान त्यावेळेस शेतकऱ्यांना झोडपून काढणारे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत गोळीबार करणारे ते पोलिसही अखेरच्या क्षणाला रडल्याच्या आठवणी ताज्या आहेत.
आंदोलनादरम्यान शासकीय आदेश आणि कायदा व सुव्यवस्थेकरिता कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसांना लगतच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनीच जेवण दिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळलेत. बहिरम यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी आधी ही यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होती. ग्रामीण संस्कृतीची उधळण करीत ती बहरायची. ही यात्रा म्हणजे गावखेड्यातील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे सुपर मार्केटच. खुला भव्य-दिव्य मॉलच.
कापूस आंदोलन
बहिरम यात्रेदरम्यान २४ जानेवारी १९७५ ला कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस आंदोलन केले. ज्या प्रांतात भाव आहे, त्या प्रांतात शेतकऱ्याला कापूस विकण्याची मुभा मिळावी म्हणून हे आंदोलन उभारले गेले. याकरिता शेतकऱ्यांसह कापसाच्या शेकडो बैलबंड्या २३ जानेवारीला सायंकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झाल्यात. बहिरमवरून तो कापूस मध्यप्रदेशात नेऊन विकण्याकरिता हे शेतकरी एकत्र आलेत.
महिला नेतृत्व
कापूस आंदोलनात कापूसतळणी येथील केशरबाई सिकची यांनी बैलबंडी अग्रस्थानी ठेवली. स्वतः त्या धुरीवर बसल्या आणि बंडी पुढे काढली. त्या पाठोपाठ इतरही बंड्या निघाल्यात. त्यांच्यासोबत भाऊ साबळे, दादा हावरे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.
पोलिस बंदोबस्त
आंदोलन मोडून काढण्याकरिता यात्रा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. बहिरम-बैतूल मार्गावर बैलगाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीचार्ज केला. गोळीबारही केला अन् गोंधळ उडाला.
शेतकऱ्यांवर अत्याचार
गोंधळात बंडीचे बैल पळाले. चाके तुटली. अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेत ते तिथेच पडून राहिले. मी-मी म्हणणाऱ्यांनाही पोलिसांनी झोडपून काढले.
शेतकरी ठार
कापूस आंदोलनादरम्यान २४ जानेवारी १९७५ ला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामापूर पथ्रोट येथील विठ्ठलराव किसनराव दोतोंडे ठार झाले. कुऱ्हा येथील एकनाथराव मानकर जखमी झाले होते.
श्रद्धांजली सभा
आंदोलनाच्या निमित्ताने २४ जानेवारीला शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन बहिरम येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीद्वारा शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. प्रकाश साबळे आणि गोपाल भालेराव यांनी ही सभा आयोजित केली आहे.