कौंडण्यपूरची पालखी आषाढी एकादशीला पंढरपुरात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:18+5:302021-07-03T04:09:18+5:30
तिवसा : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत. त्यामध्ये विदर्भातील कोंडण्यापूर येथील आई ...
तिवसा : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत. त्यामध्ये विदर्भातील कोंडण्यापूर येथील आई रुक्मिणीमातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. श्री संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी ई. स. १५९४ साली सुरू केलेली व ४२७ वर्षांची परंपरा लाभलेली विदर्भ राजकन्या जगतजननी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणीमातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी आहे.
१८ जुलै रोजी ही पालखी एसटी बसने निघणार असून, २० जुलैला एकादशीला कोंडण्यपूर देवस्थानच्या वतीने पांडुरंगाला अहेर करून २१ जुलैला परतीचा प्रवास करणार आहे.
रुक्मिणीमातेच्या पालखीने यावर्षी ४२७ व्या वर्षात पदार्पण केले असून, ही सर्वांत जुनी महाराष्ट्रातील पहिलीच पालखी आहे. प्राचीन इतिहासात अमरावती जिल्ह्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौंडण्यपूरपर्यंत भुयारी मार्ग खणले होते, असं सांगतात. या ठिकाणी एक दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा सुमारे ४२५ वर्षांची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोना नियम पाळून कौंडण्यपूरची पालखी ही मोजक्याच भाविकांना घेऊन शासनाच्यावतीने घेऊन जाण्यात येणार आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या तीरावर हे रुक्मिणीचे मंदिर आहे. देवी रुक्मिणीचे सारस कौंडण्यपूर समजले जाते. या कोंडण्यपुरात विठ्ठल व रुक्मिणीच्या आकर्षक अशा मूर्ती आहेत. कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानात कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला दहीहांडीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्यावतीने रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाते. आषाढी एकादशीला जमणाऱ्या भाविक याच कौंडण्यपुरात अभंगस्नान या वर्धा नदीत करतात.
अनेकांचे पंढरपूरला जाणे होत नाही. त्यामुळे विदर्भातील प्रतिपंढरपुरातील कोंडण्यपूर येथे आषाढी एकादशीला भाविक गर्दी करून रुक्मिणीचे दर्शन घेतात.
कोट
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीला केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावर्षीसुद्धा कोरोनामुळे देवी रुक्मिणीच्या पादुका घेऊन एसटी बसने पालखी कौंडण्यपूरहून निघणार आहे. कोरोनाचे नियम पाळले जातील, ही काळजी घेऊन कोणीही मंदिरात गर्दी करू नये.
- नामदेव अंबाळकर,
अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान
कौंडण्यपूर