अमरावतीत आढळला ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’; अंदमान-निकोबारनंतर देशाच्या मुख्य भूमीवरील पहिली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 07:00 AM2022-04-12T07:00:00+5:302022-04-12T07:00:06+5:30

Amravati News ‘पेल लेग लीफ वॅरब्लर’ अशा इंग्रजी नावाच्या ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’ या पक्ष्याची भारताच्या मुख्य भूमीवरील पहिलीच नोंद अमरावती जिल्ह्याच्या पाणवठ्यावर घेण्यात आली आहे.

‘Pale leg of warbler’ found in Amravati; The first entry on the mainland after Andaman-Nicobar | अमरावतीत आढळला ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’; अंदमान-निकोबारनंतर देशाच्या मुख्य भूमीवरील पहिली नोंद

अमरावतीत आढळला ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’; अंदमान-निकोबारनंतर देशाच्या मुख्य भूमीवरील पहिली नोंद

googlenewsNext

 

मनीष तसरे

अमरावती : ‘पेल लेग लीफ वॅरब्लर’ अशा इंग्रजी नावाच्या ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’ या पक्ष्याची भारताच्या मुख्य भूमीवरील पहिलीच नोंद अमरावती जिल्ह्याच्या पाणवठ्यावर घेण्यात आली आहे. उन्हाळी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण व छायाचित्रण करताना एप्रिल महिन्यात मनोज बिंड, वैभव दलाल, अभिमन्यू आराध्य आणि प्रशांत निकम यांनी यात यश मिळवले.

अंदमान-निकोबार बेटांवर या पक्ष्याच्या तुरळक नोंदी आहेत. ‘फिलोस्कोपस टेनेलीपस’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या पक्ष्याची ओळख पटविण्यासाठी ‘बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंटल’चे लेखक टीम इन्स्कीप, मुंबईतील पक्षी अभ्यासक आशिष बाबरे आणि पक्षीतज्ज्ञांच्या फेसबुक ग्रुपची मदत झाली.

साधारणपणे १० ते ११ सेंमी लांबीचा हा चिमुकला पक्षी इतर पर्ण वटवट्यांप्रमाणे आकर्षक दिसत नाही. फिकट गुलाबी रंगाचे पाय आणि खालच्या चोचेच्या मुळाशी असलेला फिकट गुलाबी रंग हे त्याचे खास वैशिष्ट्य. सोबतच हिरवट राखाडी पंख, लांब भुवई, पंखांवर फिकट अस्पष्ट दोन पांढऱ्या रेषा व गळ्याखालील पांढरा भाग याही ओळख-खुणा आहेत. पानाआड दडलेले छोटे कीटक, कृमी हे याचे खाद्य. ते टिपण्यासाठी कोवळ्या उन्हात झाडांच्या वरच्या भागातच यांचे जास्त विचरण होते. फिलॉसकॉपीडी कुळातील या अस्थिर व चपळ पक्ष्याचे दर्शन भारतात दुर्मीळ असल्याने याबाबत स्थानिक फारशी माहिती उपलब्ध नाही. हा पक्षी प्रामुख्याने जपान, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमारमध्ये आढळतो. बांग्लादेश व अंदमान-निकोबार बेटांवर याची तुरळक नोंद असली, तरी पक्षी निरीक्षणाच्या संकेतस्थळावर याच्या प्रतिमादेखील नाहीत.

अमरावतीच्या परिसरात घेण्यात आलेली ही महत्त्वाची नोंद म्हणजे गेल्या १० वर्षांपासून जोपासलेल्या पक्षी छायाचित्रण छंदाच्या प्रवासातील आजवरचा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. दिसण्याबाबत वॅरब्लर प्रजातीच्या बहुतांश पक्ष्यांमध्ये सारखेपणा असतो. त्यामुळे त्यांची नेमकी ओळख पटवण्यासाठी आवाजाचे ध्वनिमुद्रण हा खात्रीशीर मार्ग आहे.

- मनोज बिंड, पक्षी छायाचित्रकार, अमरावती.

Web Title: ‘Pale leg of warbler’ found in Amravati; The first entry on the mainland after Andaman-Nicobar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.