पॅनकार्ड क्लबच्या कार्यालयाला टाळे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 12:20 AM2016-04-15T00:20:00+5:302016-04-15T00:20:00+5:30
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या खासगी वित्तीय संस्थेचे स्थानिक कार्यालय चार दिवसांपासून बंद असल्याने हजारो गुंतवणूकदार ग्राहक अस्वस्थ झाले आहेत.
गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता : फौजदारी तक्रारीची शक्यता
अमरावती : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या खासगी वित्तीय संस्थेचे स्थानिक कार्यालय चार दिवसांपासून बंद असल्याने हजारो गुंतवणूकदार ग्राहक अस्वस्थ झाले आहेत. अशातच कंपनीचा संबंधित आणि स्थानिक कर्मचारी वर्ग ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याने ग्राहक वर्गात संताप व्यक्त होत आहे.
क्लब, हॉटेल्स आणि रुमनाईट शेअरच्या माध्यमातून पॅनकार्ड क्लब लिमिटेड या वित्तीय संस्थेने देशभर व्यवसायाचे जाळे विणले. रुमनाईट शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदार मिळवत लक्षावधी ग्राहकांची रक्कम गोळा केली. अमरावतीमध्येही १० वर्षापासून एजंटच्या माध्यमातून हा ‘चेन बिझनेस’ सुरू करण्यात आला. आकर्षक परतावा मिळतो म्हणून जिल्ह्यात सर्वदूरच्या नागरिकांनी पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली. तथापि पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही कंपनीने ग्राहकांची रक्कम परत देण्यास दिरंगाई चालविली आहे. वर्ष-सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार पॅनकार्ड क्लबच्या बडनेरा रोडस्थित कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. गुंतविलेली रक्कम आणि त्यावरील परतावा मिळविण्यासाठी जंग-जंग पछाडावे लागत आहे. असे असतांना सोमवार ११ एप्रिलपासून कंपनीचे बडनेरा रोड स्थित कार्यालय उघडण्यात आले नाही. कार्यालयीन वेळेत शटरबंद असल्याने ग्राहकांच्या संतापाचा कडेलोट होवू लागला आहे. पॅनकार्ड कार्यालयाचा पत्ता बदलला असून नव्या पत्त्याची प्रतीक्षा करा, असा चिटोरा शटरच्या वर लावण्यात आला. कार्यालय कुलूपबंद असल्याने ‘आपली रक्कम बुडाली’ अशी ग्राहकांची भावना झाली आहे. तर भाडे भरले नाही म्हणून कार्यालय बंद होते, अशा दावा स्थानिक व्यवस्थापनाने केला आहे.