पंढरी मध्यम प्रकल्प वरुड तालुक्यासाठी वरदान
By Admin | Published: March 21, 2016 12:16 AM2016-03-21T00:16:47+5:302016-03-21T00:16:47+5:30
पंढरी मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असूून पाण्याचा प्रश्न निश्चितच सुटेल, ...
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ४७ हजार लाभार्थी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कार्यक्रम
वरूड : पंढरी मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असूून पाण्याचा प्रश्न निश्चितच सुटेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले. पंढरी मध्यम प्रकल्प धरणस्थळ येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित पर्यावरणविषयक जाहीर लोक सुनावणीच्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ऊर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता र.प्र. लांडेकर, लोकसुनावणी समितीचे समन्वयक तथा प्रादेशिक अधिकारी अ.ज. कुडे, अ.ना. लाडोणे आदी उपस्थित होते.
गीत्ते पुढे बोलताना म्हणाले की, पंढरी मध्यम प्रकल्पात संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ४१४ कि.मी.चे आहे. या प्रकल्पात पिण्यासाठी ८.५२१ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी आरक्षित असल्यामुळे तालुक्यातील गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न निश्चितच सुटणार आहे. तालुक्यात ८३७० हे. सिंचनक्षेत्र आहे. याचा तालुक्यातील ४० गावांतील ४७ हजार लोकांना लाभ घेता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे वहिवाटीचे रस्ते या प्रकल्पात गेले त्यांच्यासाठी पांदण रस्ते तयार करण्यात येतील, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित शेतजमीन असते. त्यांची जमीन जेव्हा प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाते तेव्हा त्यांची मनोवस्था दोलायमान होते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसुनावणीमध्ये गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्पासंबंधी प्रश्नदेखील विचारले. तालुक्यातील गणेशपूरपर्यंत पाणीपुरवठा होणार का, याचे उत्तर देताना गीत्ते म्हणाले की, ज्या गावात धरणाच्या पाण्याचा पुरवठा होणार नाही तेथील शेतकरी बांधवांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घ्यावा.
प्रास्ताविक रितेश तायडे व आभार प्रदर्शन जितेंद्र पुराते यांनी केले. या लोकसुनावणीदरम्यान गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी निरसन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)