क्रिएटिव्ह अॅकेडमीला कुलूप लावून पांडे पसार
By Admin | Published: April 4, 2017 12:20 AM2017-04-04T00:20:59+5:302017-04-04T00:20:59+5:30
सिंधी कॅम्प परिसरातील राम-लक्ष्मण संकुलातील क्रिऐटिव्ह अॅकेडमीला कुलूप लावून मनोज पांडे पसार झाला आहे.
विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण : पोलिसांचे तीन पथकाद्वारे शोधकार्य
अमरावती : सिंधी कॅम्प परिसरातील राम-लक्ष्मण संकुलातील क्रिऐटिव्ह अॅकेडमीला कुलूप लावून मनोज पांडे पसार झाला आहे. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पांडेवर आहे. आरोपी मनोज पांडेला अटक करण्यासाठी गाडगेनगर पोलिसांच्या तीन पथकांनी शोधकार्य सुरु केले आहे.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना लेखाकर्म विषयाचे शिक्षण देणाऱ्या मनोज पांडे याने एका २० वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. अॅकेडमीच्या आड विद्यार्थिनीसोबत असले अश्लिल प्रकार घडत असल्याने ही बाब शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संबंधांना काळीमा फासणारीच आहे. राम-लक्ष्मण संकुलाच्या पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही क्रिएटिव्ह अॅकेडमी आहे. यासंकुलात केवळ मोजकीच दुकाने असून तिसरा मजला क्रिएटिव्ह अॅकेडमीटच्याच ताब्यात आहे. संकुलाच्या एका बाजूने पायऱ्या असून तिसऱ्या मजल्यापर्यंत शुकशुकाट असतो. सकाळच्या सुमारास या अॅकेडमीत विद्यार्थी शिकवणीसाठी यायचे. त्यानंतर या संकुलात भयाण शांतता असते. अशा निर्मनुष्य संकुलात मनोज पांडे शिकवणीवर्ग घेत होता. या अॅकेडमीच्या पाच ते सहा वर्गखोल्या असून त्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत.
पांडेच्या पाच सहकाऱ्यांची चौकशी
अमरावती : मात्र, चार दिवसांपासून दोन्ही प्रवेशद्वारांचे शटर्स बंद असल्याचे सांगितले जात आहे. लाजीरवाणा प्रकार उघड होण्याची चिन्हे दिसताच मनोज पांडे याने अॅकेडमीला कुलूप लावून पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी क्रिएटिव्ह अॅकेडमीची पाहणी केली. मात्र, त्यांना शटर्सला कुलूप लागल्याचे आढळून आले. त्यांनी संकुलातील चौकीदाराची चौकशी केली असता मनोज पांडे हा शिकवणीवर्ग संपल्यानंतर दुपारी तरूणीसह दुचाकीवरून यायचा आणि अॅकेडमीतील कक्षामध्ये तास दोन तास थांबायचा, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी मनोज पांंडेच्या महेंद्र कॉलनीतील घरी जाऊन चौकशी केली असता त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वीच आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचे कळले. मात्र, लग्नानंतर ते अद्याप घरी न आल्याचेही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. यासंदर्भात कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस आयुक्तांच्या सक्त सूचना
विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणप्रकरणाची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून मनोज पांडेला तत्काळ अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना सक्त सूचना दिल्या आहेत. मनोज पांडेची मित्र मंडळी व कुटुंबातील पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच पांडेच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचे शोधकार्य सुरु आहे. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले आहे. मनोज पांडेला अटक करून कठोर कारवाई केली जाणार आहे.
अन्यायाविरूद्ध मुलींनी पुढे यावे
क्रिएटिव्ह अॅकेडमीचे संचालक मनोज पांडे याचे हे कृत्य शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. लैंगिक शोषणाविषयी सध्या एका मुलीने तक्रार केली आहे. मात्र, अन्य मुलींबाबतही असे प्रकार घडले असतील तर त्या विद्यार्थिनींनी धाडसाने पुढे येऊन नि:संकोचपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे.