वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४६ लाखांचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:00+5:302021-07-20T04:11:00+5:30
कोरोनाचा फटका; जिल्ह्यातून यंदा एसटी बसने एक पालखी रवाना अमरावती ; कोरोनामुळे गतवर्षी शासनाने पंढरपूरची आषाढी यात्रा स्थगित करण्यात ...
कोरोनाचा फटका; जिल्ह्यातून यंदा एसटी बसने एक पालखी रवाना
अमरावती ; कोरोनामुळे गतवर्षी शासनाने पंढरपूरची आषाढी यात्रा स्थगित करण्यात आली होती. केवळ मोजक्याच पालख्यांना प्रवेश दिला जात होता. तीच परिस्थिती यंदाही कोरोनामुळे कायम ठेवण्यात आली आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला कधी भेटणार, याची आस वारकऱ्यांना लागली आहे. दुसरीकडे याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाला आहे. कोरानामुळे पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश नसल्याने अमरावती विभागाला गतवर्षीप्रमाणे यंदाही ४६ लाख ४७ हजारांचा फटका बसणार आहे. शासनाने पंढरपुरात मानाच्या केवळ दहा पालख्यांना परवानगी दिली आहे. यात विदर्भातील आणि तीही अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील पालखी एसटी बसने पंढरपूर येथे येण्यास हिरवी झेंडी दिली आहे.
बॉक्स
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
पंढरपूरला तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी, घुईखेड येथील बेंडोजी महाराजांची पालखी, अंजनगाव सुर्जी येथील रूपलाल महाराजांची पालखी , गणोरी येथील मोहम्मद खान महाराजांची पालखी तसेच अन्य धार्मिक संस्थांतर्फे पायी वारी जाते. त्यांसह जवळपास आठ ते दहा वारकऱ्यांची मोठी संख्या असलेल्या पालख्या पंढरपूरला जातात.
बॉक्स
यंदा एसटीने एकच पालखी
कोरोनामुळे शासनाने यंदाही पंढरपूर येथील यात्रोत्सव रद्द केला आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यातून दहा पालख्यांनाच पंढरपुरात येण्याची परवानगी दिली आहे. यात कौंडण्यपुरातील रुक्मिणी माता संस्थानची पालखी १८ जुलै रोजी एसटी बसने रवाना झाली.
बॉक़्स
दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जाणाऱ्या बस - ५९
दररोज मिळणारे उत्पन्न - ६,००,०००
एसटीतून दरवर्षी पंढरपूरसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या -१६१४९
बॉक़्स
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना !
कोट
प्रकृतीअभावी पायी वारी करणे शक्य नसल्याने मी दरवर्षी बसने पंढरपूरला जात असतो. पंढरीची वारी म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. मात्र, गतवर्षीप्रमाणे कोरोनाने यंदाही आमच्या वारीचा आनंद हिरावून घेतला आहे. त्यामुळे विठुरायाचे दर्शन आता कधी होणार, याची आस लागून आहे.
- गणेश रौंदळे, वारकरी
कोट
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला कधी पायी, तर कधी एसटी बसने दरवर्षी जातो. मात्र गत मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे इच्छा असतानाही पंढरीला जात येत नसल्याचे दु:ख होत आहे. शासनाने कोरोनामुळे पंढरीत वारकऱ्यांना येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नाइलाज आहे.
- अनिल तुमसरे, वारकरी
कोट
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अमरावतीतून पंढरपूर बस सेवा विस्कळीत झाली आहे. अशातच एक बस पंढरपूरसाठी सोडण्यात येत होती. मात्र, तिलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तिही बंद करण्यात आली आहे.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक