पंढरपूर स्पेशल रेल्वे १७, २० जुलै रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:27 PM2018-07-08T22:27:19+5:302018-07-08T22:28:08+5:30
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्ये रेल्वे प्रशासनाने १७ व २० जुलै रोजी स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्ये रेल्वे प्रशासनाने १७ व २० जुलै रोजी स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी असणार आहे.
विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी वारकरी समुदाय पंढरपुरात जातो. विठ्ठलाचा गजर, पायदळ वारीने पंढरपूरच्या दिशेने दिंड्या रवाना झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा पंढरपूरकरिता स्पेशल रेल्वे गाडी सुरू करून वारकरी समुदायांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या स्पेशल गाडीत १८ सामान्य डब्यांची व्यवस्था करण्यात आली असून, अकोली रेल्वे स्थानकाहून पंढरपूरकडे १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता रवाना होईल. पंढरपूर येथून अमरावतीकडे ही स्पेशल गाडी १८ व २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रवाना होईल, असे वेळापत्रक तयार केले आहे. विठ्ठलभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कारवाईचा सामना करावा लागेल, ही बाब अमरावती रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरिक्षक सयाम यांनी स्पष्ट केली आहे.
पंढरपूर स्पेशल गाडीचे हे असतील थांबे
अमरावती-पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन अमरावती (अकोली), बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, कर्डूवाडी व पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहे.
नागपूर-कोल्हापूर, अमरावती-पुणे या गाडीने करता येईल प्रवास
अमरावती- पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीने विठ्ठलभक्तांना पंढरपूरला जाणे सुकर होत असले तरी नागपूर-कोल्हापूर व अमरावती-पुणे रेल्वे गाडीने पंढरपूरकडे जाता यावे, अशी सोय केली आहे. नागपूर-कोल्हापूर ही आठवड्यातून मंगळवार व शनिवारी धावते. बडनेरा रेल्वे स्थानकाहून या गाडीने पंढरपूर येथे जायचे असल्यास सायंकाळी ६ वाजता जाता येईल. अमरावती-पुणे रेल्वनेही जाता येईल. सोमवार व शनिवारी गाडी अमरावती रेल्वे स्थानकाहून निघेल. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरा रेल्वे स्थानकाहून दुपारी २ वाजता रवाना होईल. कुर्डूवाडीपर्यंत सहज प्रवास करून पंढरपूर गाठता येईल. नागपूर-पुणे या गाडीने सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वे स्थानकाहून रात्री ९ वाजता जाता येईल. कुर्डूवाडीपर्यत प्रवास करणे सोईचे आहे.