पंढरपूर स्पेशल रेल्वेने १,२४१ विठ्ठलभक्त रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:59 PM2018-07-17T22:59:22+5:302018-07-17T22:59:54+5:30

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली.

Pandharpur Special Trains to 1,241 Vitthal Bhawakis | पंढरपूर स्पेशल रेल्वेने १,२४१ विठ्ठलभक्त रवाना

पंढरपूर स्पेशल रेल्वेने १,२४१ विठ्ठलभक्त रवाना

Next
ठळक मुद्देएक लाख ८५ हजारांचे उत्पन्न : नया अमरावती रेल्वे स्थानकाहून सुटली गाडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली. यात १,२४१ विठ्ठल भक्तांनी ७५० तिकीट घेऊन प्रवास आरंभला. या विशेष गाडीमुळे एक लाख ८५ हजार ४४५ रूपयांचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे. आता २० जुलै रोजी दुसरी फेरी पंढरपूरकडे रवाना केली जाणार आहे. तर, पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी १८ व २४ जुलै रोजी स्पेशल रेल्वे गाडी सुटणार आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी ठेवून मंगळवार, १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपासूनच नया अमरावती रेल्वे स्थानकावर भक्तांचे जत्थेच्या जत्थे दिसून आले. कपाळी टिळा, पांढरे शुभ्र पोषाख परिधान करून विठ्ठल भक्तांची रेल्वे स्थानकावर मांदियाळी दिसून आली. विठ्ठल भक्त पंढरपूरकडे जाणार असल्याने युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांनी भक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. नियोजित वेळेनुसार पंढरपूर स्पेशल रेल्वे ही दुपारी २ वाजता रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही गाडी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वे स्थानकावर आली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता रवाना झाली. भक्तांना प्रवासात कोणतीही अडचण जाऊ नये, यासाठी मुख्य वाणिज्य खंड अधिकारी शरद सयाम, माल पर्यवेक्षक व्ही.डी. कुंभारे, मुख्य तिकीट पर्यवेक्षक पी.पी.किन्हीकर, नया अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक रंगारी, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर स्पेशल गाडीत १८ सामान्य डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
येथे थांबणार गाडी
अमरावती-पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन अमरावती (अकोली), बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, कुर्डूवाडी व पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत.

Web Title: Pandharpur Special Trains to 1,241 Vitthal Bhawakis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.