विनापरवानगी लग्नाची पंगत, ५० हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:26+5:302021-05-10T04:13:26+5:30
परतवाडा : कोरोना नियमांतर्गत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना अचलपूर तालुक्यातील टवलार येथे रविवारी विनापरवाना लग्नाची पंगत सुरू ...
परतवाडा : कोरोना नियमांतर्गत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना अचलपूर तालुक्यातील टवलार येथे रविवारी विनापरवाना लग्नाची पंगत सुरू असल्याच्या कारणावरून बीडिओ जयंत बाबरे व त्यांच्या पथकाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कडक लॉकडाऊनदरम्यानची तालुक्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
जिल्ह्यात ९ एप्रिलपासून सर्वच व्यवहार बंद करण्यात आले आहे. रविवारी अचलपूर तालुका ग्रामीण कोविड-१९ प्रतिबंधक पथक तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर असताना टवलार येथे अरुण पातोंड यांच्याकडे जेवणाची पंगत दिसून आली. गटविकास अधिकारी जयंत बाबरे, विस्तार अधिकारी महादेव कास्देकर, विस्तार अधिकारी पंचायत राजू कारंजकर यांनी पातोंड यांना ५० हजार रुपयांच्या दंडाची पावती देऊन सदर रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी दौरा सुरू केल्याने ही बाब उघडकीस आली तर नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर परिसरातील धाबे व इतरही दुकानांची तपासणी या पथकाने केली.