पंकजा मुंडे यांचे दुर्दैव.. त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते; चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया
By गणेश वासनिक | Published: November 24, 2023 06:05 PM2023-11-24T18:05:50+5:302023-11-24T18:08:32+5:30
संजय राऊत यांना कोणीच सिरीयस घेत नाही
अमरावती : भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहे. खरे तर त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते. हे पंकजा मुंडे यांचे दुर्देव असल्याची खोचक प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
ना. पाटील हे शुक्रवारी अमरावतीच्या दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामभवनात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. जायकवाडी धरणातून पाणी देणे थांबविले, या प्रश्नावर बोलताना ना. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की मराठवाडयाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणारच आहे. यात कोणताही बदल हाेणार नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी १४५ आमदार झाले की पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार, अशी भूमिका जाहीर केल्याबाबत ते म्हणाले, महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडले. ते मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची प्रकारची प्रतिक्रिया देणे हे चुकीचे नाही. लोकशाहीमध्ये तेवढा आकडा जुडला की करता येते, अशी पुष्टीही ना.पाटील यांनी जोडली. मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मुख्यमंत्रीही त्यांना सूचना करू शकत नाही अंतर्गत तरतूद असलेला तो आयोग आहे त्यावर मी टिपणी करणार नाही, अशी भूमिका ना. चंद्रकात पाटील यांनी जाहीर केली.
संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही सिरीयस घेत नाही: ना. पाटील
शिवसेना (ठाकरे गट)चे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बहुतांश खासदार हे भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार, असे व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ना.चंद्रकात पाटील यांनी संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही सिरीयस घेत नाही, असे म्हणत राऊतांची खिल्ली उडविली. तसे तर राज्यात कोणीही संजय राऊत यांना सिरीयस घेत नाही. तुम्ही रोज दाखवता म्हणून ते उत्साहाने काही बोलण्याचा त्यांचा धाडस करतात, असे ते म्हणाले