पंजाला धनुष्याची साथ, भाजपवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 12:05 AM2017-03-22T00:05:01+5:302017-03-22T00:05:01+5:30
ऐनवेळी निर्माण झालेल्या दोलायमान राजकीय स्थितीमुळे काँग्रेसकडे बहुमत असूनही झेडपीची सत्ता भाजपच्या वाट्याला जाते की काय, ....
जिल्हा परिषद : वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, आनंदराव अडसूळ, संजय बंड यांचे नेतृत्व सिद्ध
काँग्रेसचे नितीन गोंडाणे अध्यक्ष, शिवसेनेचे दत्ता ढोमणे उपाध्यक्ष
अमरावती : ऐनवेळी निर्माण झालेल्या दोलायमान राजकीय स्थितीमुळे काँग्रेसकडे बहुमत असूनही झेडपीची सत्ता भाजपच्या वाट्याला जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली; तथापि काँग्रेसच्या दिग्गजांनी एकजुटीचा परिचय दिला अन् जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्याचवेळी राकाँ आणि शिवसेनेच्या साथीने सत्ता स्थापनेचे भाजपचे मनसुबेही काँग्रेसने उलथवून लावले.
जिल्हा परिषदेच्या ३० व्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात निवडणूक पार पडली. झेडपीचे तख्त काँग्रेसच्याच वाट्याला येणार हे जवळपास निश्चित असूनही भाजपने केलेल्या राजकीय खेळीमुळे संभ्रमाची स्थिती उत्पन्न झाली होेती. मात्र, निवडणुकीत सर्व शंका, संभ्रमांवर मात करीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना युतीचे काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गोंडाणे हे ३२ मते मिळवून विजयी झाले. गोंडाणे यांनी भाजपचे शरद मोहोड यांचा ६ मतांनी पराभव केला. मोहोड यांना २६ मते मिळालीत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडीचे सेनेच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार दत्ता ढोमणे यांनीही ३२ मते घेऊन प्रहारच्या योगिनी जयस्वाल यांचा ६ मतांनी पराभव केला. मंगळवारी सकाळी ११ वाजतापासून निवडणूक प्रक्रियेला झेडपीच्या सभागृहात सुरूवात झाली. काँग्रेसच्यावतीने अध्यक्षपदासाठी नितीन गोंडाणे यांंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून काँग्रेसच्या सदस्य वासंती मंगरोळे यांनी स्वाक्षरी केली. भाजपकडून शरद मोहोड यांनी उमेदवारी दाखल केली. सारंग खोडस्कर सूचक होते. एका जागेसाठी उपरोक्त दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले होते.
हात उंचावून मतदान
अमरावती : उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता ढोमणे, तर भाजप-प्रहार युतीतर्फे योगिनी जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दत्ता ढोमणे यांचे सूचक सेनेचे विठ्ठल चव्हाण तर प्रहारच्या योगिनी जयस्वाल यांचे सूचक रवींद्र मुंदे होते.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दोन्ही पदांकरिता प्राप्त अर्जांची छाननी करून सर्व अर्ज कायम असल्याचे घोषित केले. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी मराठी वर्णमालेतील क्रमानुसार प्रथम अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात काँग्रेसचे नितीन गोंडाणे यांच्या बाजूने काँग्रेसचे २६, रिपाइं गवई गट १, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेच्या ३ अशा एकूण ३२ सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार शरद मोहोड यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना भाजपचे १३, प्रहार ५, राष्ट्रवादी ३, बसप १, लढा १,अपक्ष १ आणि युवा स्वाभिमान २ अशा २६ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव सदस्य देवेंद्र भुयार यांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे मतदानप्रक्रियेत ५९ पैकी ५८ सदस्यांनीच प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत झेडपीच्या एकूण ५९ सदस्यांसोबतच १४ पंचायत समिती सभापतींचीही उपस्थिती होती. मात्र, त्यांना नियमानुसार मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
अमरावतीचे उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी यांनी पीठासीन अधिकारी तर अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी सहायक पिठासीन अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांनी सचिवपदाची जबाबदारी पार पाडली.
शेतकऱ्यांना सत्तेत असलेल्या कुठल्याही पक्षाने न्याय दिला नाही. त्यामुळे शेतकरी व सामन्य जनतेचे अनेक प्रश्न अंधातरीत आहे. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी आपण जिल्हा परिषदेत कुणाच्याही बाजूने उभे न राहता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- देवेंद्र भुयार,
जि.प. सदस्य स्वाभिमानी
जि.प.ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे. संस्थेचा अध्यक्ष म्हणून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पाणी हे मुलभूत प्रश्न सोडवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
- नितीन गोंडाणे, नवनिर्वाचित अध्यक्ष
पक्षनेतृत्वाने उपाध्यक्षपदाची सोपविलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेन. ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यास प्राथमिकता देईन.
- दत्ता ढोमणे, उपाध्यक्ष
विषय समिती सभापतीसाठी ३ एप्रिलला विशेष सभा
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. यासाठी जि.प.सदस्यांना नोटीशी पाठविल्या जात आहेत. प्रथम समाज कल्याण समितीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या सदस्यांमधून सभापतींची तर दुसऱ्यांदा महिला व बालकल्याण समिती सभापतीची निवड केली जाते. त्यानंतर इतर दोन समितींसाठी सभापती निवडले जातात.
सभापती निवडीचा कार्यक्रम
चारही विषय समितींसाठी ३ एप्रिल रोजी दुपारी ११ ते १ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारणे, दुपारी ३ वाजता सभेची सुरूवात व अर्जांची छाननी, त्यानंतर अर्जांची माघार, पश्चात प्रथम समाज कल्याण सभापती,नंतर महिला, बालकल्याण सभापती, उर्वरीत दोन सभापती निवडले जातील.