संस्थात्मक प्रसूतीत पापळ पीएचसी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:06+5:302021-05-22T04:13:06+5:30
वर्षभरात २५५ प्रसूती यशस्वीरित्या पार पडल्या अमरावती : ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयांतील संस्थात्मक प्रसूतीत पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ...
वर्षभरात २५५ प्रसूती यशस्वीरित्या पार पडल्या
अमरावती : ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयांतील संस्थात्मक प्रसूतीत पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक मिळवला. गत वर्षापासून २५५ संस्थात्मक प्रसूती पापळ पीएचसीत सुखरूपपणे पार पडल्या असून, कोविड काळातही येथील संस्थात्मक प्रसूतीचा दर वाढला आहे.
माता व बालमृत्यू दर कमी होण्यासाठी संस्थात्मक प्रसूती होणे गरजेचे असते. आरोग्यविषयक निर्देशांकातही संस्थात्मक प्रसूती या घटकाची गणना होते. जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व कार्यक्षेत्रातील खासगी संस्था मिळून ५,६६६ संस्थात्मक प्रसूती झाल्या. त्यातील २ हजार ८८५ प्रसूती प्रा. आ. केंद्रात झाल्या. जिल्ह्यात एकूण ५९ पीएचसी असून, पापळ येथील प्रा. आ. केंद्रात २५५ हून अधिक प्रसूती सुखरूपपणे पार पडल्या. पापळ केंद्राला यापूर्वी दोनवेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. या यशात तेथील आरोग्य सहायिका निर्मला लकडे यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. लकडे या २४ वर्षांपासून आरोग्यसेविका व नंतर सहायिका अशा पदावर कार्यरत असून, त्यांनाही फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार यापूर्वीच प्राप्त आहे. कोविड काळातही प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यात खंड पडू न देता निरंतर काम करत आहे. पापळ येथील सर्व सहका-यांचे कौतुक पालकमंत्री यशोमती ठाकूर, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,सीईओ अविश्यांत पंडा,डीएचओ डॉ.दिलीप रणमले यांनी केले आहे.
बॉक्स
कठीण शस्त्रक्रिया पार पाडतात
पापळ केंद्रात ३४ गावे जोडली आहेत. तिथे अनेकदा वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातूनही केसेस येतात. कोविडकाळात संपूर्ण सुरक्षितता व दक्षता पाळून शस्त्रक्रिया केल्या जातात. लकडे यांनी परिश्रमातून प्रसूती व संगोपनशास्त्रात कौशल्य मिळवले, तसेच त्या २४ वर्षांपासून निष्ठापूर्वक सेवा देत आहेत. त्यांनी अनेक क्रिटिकल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.