दहिगावात महसूल विभागाचे समांतर प्रशासन
By admin | Published: June 9, 2014 11:21 PM2014-06-09T23:21:01+5:302014-06-09T23:21:01+5:30
तालुक्यातील दहिगाव येथे सोमवारी दुपारी एका घरावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी बँकेच्या कर्जासाठी दिले गेलेले बोगस सातबारा व तलाठय़ांचे वेगवेगळ्या गावाच्या नावांचे शिक्के
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव येथे सोमवारी दुपारी एका घरावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी बँकेच्या कर्जासाठी दिले गेलेले बोगस सातबारा व तलाठय़ांचे वेगवेगळ्या गावाच्या नावांचे शिक्के आणि शासनाद्वारे वापरले जाणारे गोल सिक्के जप्त केले.
दहिगाव येथील सुरेश मेश्राम यांच्या घरातून ही जप्तीची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र बँकेच्या सुर्जीच्या शाखेने महसूल विभागाला या प्रकाराबाबत सतर्क केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तहसीलदारांसोबत अंजनगावचे ठाणेदार गजानन पडघन, मंडळ अधिकारी विनोद अढाऊ व पटवारी प्रवीण गेडाम होते. जप्त करण्यात आलेल्या शिक्क्यांमध्ये अंजनगाव तालुक्यासोबतच चिखलदरा तहसील कार्यालयातील गावांचाही समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
प्राप्त माहितीनुसार, दहिगाव येथे गट क्र. ६0 व गट क्र. ९४ चे बनावट सातबारा तयार करून त्याद्वारे सुर्जी येथील महाराष्ट्र बँकेत पीक कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. याप्रकरणी बँक प्रशासनाला संशय आल्याने सातबारा पडताळणीसाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे देण्यात आला. त्यात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जप्त करण्यात आलेल्या शिक्यांवरून दहा ते बारा गावांच्या नावाचे शिक्के तयार करण्यात आल्यामुळे या गावाच्या हद्दीतील अनेक बोगस सातबारा वितरीत झाल्याची शक्यता आहे. याच गावातील एका मास्टर माईंड सेवानवृत्त कर्मचार्याने यापूर्वी असे बनावट सातबारा तयार करून जिल्हा बँकेला सन २0१0 मध्ये लाखो रूपयांचा चुना लावला होता. पण या प्रकरणात संबंधित सातबारा हे प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींचे असल्याने हे प्रकरण दाबण्यात आले होते. हे प्रकरण दाबल्यामुळेच गुन्हेगार पुन्हा शिरजोर झाले. जप्त केलेल्या सातबारावर कोरडवाहू शेती ही ओलिताची दाखवून त्यावर संत्रा झाडे व केळीचे पीक दाखविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)