बोराळ्यात परमहंस झाबुजी महाराजांची निघाली पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:18+5:302021-01-14T04:11:18+5:30

जागर भक्तीचा : सहिष्णुता जोपासणाऱ्या उपक्रमाने बोराळा दुमदुमले दर्यापूर : तालुक्यातील बोराळा (आराळा) येथे श्री संत परमहंस झाबुजी ...

Paramahansa Jhabuji Maharaj's palanquin left in Borala | बोराळ्यात परमहंस झाबुजी महाराजांची निघाली पालखी

बोराळ्यात परमहंस झाबुजी महाराजांची निघाली पालखी

googlenewsNext

जागर भक्तीचा : सहिष्णुता जोपासणाऱ्या उपक्रमाने बोराळा दुमदुमले

दर्यापूर : तालुक्यातील बोराळा (आराळा) येथे श्री संत परमहंस झाबुजी महाराजांच्या भक्तांनी टाळ, ढोल, मृदंग, डफड़े आणि बासरीच्या सुरावर भक्तीचा जागर केला. सोमवारी गावातून निघालेल्या पालखी मिरवणुकीतून सहिष्णुतेचा संदेश दिला.

अकोला जिल्ह्यातील वाकी येथील श्री संत परमहंस झाबुजी महाराज यांच्या प्रेरणेने बोराळा(आराळा) येथील प्रतिष्ठित नागरिक दिगांबर कळस्कर हे १८ वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने

श्री संत परमहंस सद्गुरु झाबुजी महाराज यांच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. पंचक्रोशीतील दिंड्या या सोहळ्यात सहभाग घेतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. मंगळवारी प्रारंभी संपूर्ण गावात प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून, रांगोळी काढून साफसफाई करण्यात आली. त्यानंतर निघालेल्या पालखीचे घरोघरी मनोभावे पूजन करण्यात आले. एवढेच नव्हे तर टाळ, मृदंग, डफड़े आणि बासरीच्या सुरावर व ढोलकीच्या तालावर भाविक भक्तांनी ताल धरला. भक्तिगीतांनी बोराळा गाव दुमदुमुन गेले होते.

हभप विट्ठल महाराज चौधरी यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. स्थानिक भजन मंडळ, श्री संत गाडगे महाराज महिला मंडळ, जय गुरू भजन मंडळ, ढोलाचे भजन मंडळ (आपातापा), महिला भजन मंडळ यांनी पालखी दिंडीत सहभाग घेतला.

श्री संत परमहंस झाबुजी महाराज यांना मानणारा प्रत्येक जातीपंथाचे लोक आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात गावातील सर्वधर्म समभावाचे दर्शन घडले. सर्वांनी एकदिलाने पालखी दिंडी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Paramahansa Jhabuji Maharaj's palanquin left in Borala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.