पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारले; बँक अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:44 AM2019-02-23T06:44:11+5:302019-02-23T06:44:39+5:30
अमरावतीमधील प्रकार; पोलिसांकडून चौकशी सुरू
अमरावती : येथील बियाणी चौकातील भारतीय स्टेट बँक शाखेने पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारल्याप्रकरणी कर्ज प्रकरणाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत शुक्रवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अनिल अंतुराव चव्हाण (२६) यांच्या तक्रारीवरून पंकज चिखले यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ४ फेब्रुवारीला स्टेट बँकेत मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज मागितल्यावर व्यवस्थापक पंकज चिखले यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. पारधी समाज रस्त्यावर फिरतो. तुम्हाला सगळे फुकट पाहिजे. मी तुम्हाला योजनेचा लाभ देऊ शकत नाही, असे चिखले म्हणाले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून पाच सहा जणांना बाहेर काढत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले, असे तक्रारीत नमूद आहे.
पारधी शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्या भेटीला
भारतीय स्टेट बँकेत पारधी समाजाला कर्ज नाकारल्याप्रकरणी ४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांची भेट घेऊन पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने घडलेला प्रकार सांगितला होता.
तक्रारीच्या आधारे अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला आहे. चौकशी सुरू केली आहे. तपासात वास्तव समोर येईल.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, अमरावती