कविता इंगोले मृत्यूप्रकरणी पतीला अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:53 PM2017-11-09T18:53:25+5:302017-11-09T18:54:04+5:30
नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली.
नांदगाव खंडेश्वर : चांदूर रेल्वे येथील शिक्षिका कविता कीर्तिराज इंगोले (४०) यांच्या मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी कीर्तिराज नामदेव इंगोले (४२, रा. चांदूर रेल्वे) यास गुरुवारी अटक केली. या प्रकरणी भादंविच्या ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती कीर्तिराज ही मृत कविता इंगोलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता.
पगाराचे सर्व पैसे आरोपी देण्यास बजावत होता. तसे न केल्यास त्रास देत होता. या जाचाला कंटाळून एका महिन्यापूर्वी कविता इंगोले नांदगाव खंडेश्वर येथे माहेरी आल्या व येथूनच चांदूरच्या शाळेवर ये-जा करीत होत्या. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी त्या घरी परतल्या नाही. ८ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. कविताच्या मानेवर व्रण असल्याने भाऊ गजानन कटक तलवारे याने कीर्तिराजवर संशय व्यक्त केला होता.
कीर्तिराज कवितासोबत होता, असे चांदूर रेल्वे येथील वकिलानेही सांगितले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून कीर्तिराजला सात तासांत जेरबंद केले. ९ नोव्हेंबरला त्याला नांदगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार व उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मगन मेहते व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहे.