धार्मिक दीक्षा देण्यासाठी आई-वडिलांची बळजबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:39 PM2018-12-19T22:39:26+5:302018-12-19T22:39:41+5:30
आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरपिंगळाई : आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला.
रिद्धपूरनजीकच्या ब्राह्मणवाडा (दिवे) येथे स्थित असलेल्या महानुभाव पंथ आश्रमातील रहिवासी सन्याशी गोपालमुनी उर्फ अवेराजबाबा शेवतकर आणि तपस्विनी रत्नाताई शेवतकर यांची दत्तक कन्या स्नेहल (बदलेले नाव) ही सुमारे दीड वर्षांपूर्वी ब्राह्मणवाडा येथील राहत्या घरून बेपत्ता झाली. त्यावेळी नातेवाईक निरंजन ठाकरे, मुलीची मैत्रिण संजीवनी (बदलेले नाव) व अन्य काही मैत्रिणींनी आमच्या मुलीला पळवून लावल्याचा आरोप शेवतकर यांनी शिरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला. त्या अनुषंगाने पोलिसांनी स्नेहलच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरून शोध चालविला. त्यावेळी ती औरंगाबाद येथे खासगी नोकरी करीत असल्याचे माहिती पडले. पोलिसांनी तिला परत आणून विचारपूस केली असता, आईवडिलांनी तिला महानुभावपंथाची दीक्षा देण्यासंबंधी जबरदस्ती केल्याने ती मानसिक तणावात आली आणि आई-वडिलांसोबत पटत नसल्यामुळे व ते त्रास देत असल्यामुळे घरातून स्वमर्जीने एकटेच निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. स्नेहलाल शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हायचे होते. परंतु, तिचे आई-वडील याला विरोध करीत होते. आतासुध्दा आई -वडिलांकडे न जाता औरंगाबादला रहायचे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले असून, तिने पोलिसांना अॅफिडेव्हीटसुद्धा करून दिले. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार, मोर्शी विभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात शिरखेडचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, अधिकारी वैभव पराते, पोलीस हेड कॉन्स्टेबल तिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विवेक हेडावू यांनी कारवाई केली.
दत्तक कन्येला पळवून नेल्याची तक्रार महानुभावपंथ आश्रमातील शेवतकर यांनी केली होती. मुलीचा शोध घेऊन विचारपूस केली असता, आई-वडिलांनी धार्मिक दीक्षेसाठी बळजबरी केल्याने निघून गेल्याचे ती सांगत आहे.
- सुरेंंद्र अहेरकर, पोलीस निरीक्षक, शिरखेड ठाणे