आई-वडिलांनो, मुलांवर प्रेम उधळा ना!

By admin | Published: January 20, 2016 12:20 AM2016-01-20T00:20:28+5:302016-01-20T00:20:28+5:30

परवा धक्कादायकच घडले. १४-१५ वर्षांची दुचाकी चोर पोरं पोलिसांनी पकडली.

Parents, do not miss love on the kids! | आई-वडिलांनो, मुलांवर प्रेम उधळा ना!

आई-वडिलांनो, मुलांवर प्रेम उधळा ना!

Next

प्रासंगिक गणेश देशमुख
परवा धक्कादायकच घडले. १४-१५ वर्षांची दुचाकी चोर पोरं पोलिसांनी पकडली. या मुलांनी चोरी केल्याचे केवळ कबुलच केले नाही तर त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकीही जप्त करण्यात आल्यात. आयुष्याच्या इमारतीला आकार देण्याच्या संवेदनशील वयात ही मुले धीट चोर झालेली आहेत. हा गुन्हा जितका मुलांचा तितकेच हे अपयश आईवडिलांचेही!
शहरातील घाईगर्दीच्या जीवनशैलीत प्रत्येकाची धडपड आणि धावपळ आहे ती केवळ मुला-मुलींना सर्वोत्तम बाबी मिळवून देण्यासाठीच. ऐपत नसतानाही बरीच पालकमंडळी त्यांच्या पाल्यांना उत्तमोत्तम शाळेत प्रवेश देतात. शिक्षणावर क्षमतेबाहेरचा खर्च करतात. पाल्यांच्या जडणघडणीत जराही कमतरता राहू नये, यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसतात.
आजुबाजुला सुरू असलेल्या एकसुरी स्पर्धेत आजचा पालक कळत नकळत केव्हा सहभागी होतो, हे त्यालाही कळत नाही. मुलांना यशस्वी बनविण्यासाठी जणू शहरभर घराघरात होडच लागलेली आहे. मुलं आता शर्यतीची बैलं झाली आहेत. माझ्या मुलाने जग जिंकावेच ही दुर्दम्य इच्छा प्रत्येकच पालकाची. मुलगा यशस्वी होईस्तोवर पालक दडपणात वावरतात आणि मुलांवरही हे दडपण लादलं जातं. जे यश मुलांनी मिळावावं असं पालकांना वाटतं ती यशस्वीतेची व्याख्या सर्वांच्या लेखी सारखीच आहे. गलेलठ्ठ पगाराची (पॅकेजची) नोकरी, दिमतीला महागडी आलिशान गाडी, नजरेत भरणारा बंगला, हाताशी नोकरचाकर- ही यशस्वीतेची व्याख्या. शिक्षणानंतर मुलांना हे सर्व मिळायला सुरुवात झाली की, आईवडिल समाधानी असतात.
पुण्याचे एक अत्यंत अनुभवी शिक्षणतज्ज्ञ अमरावतीत आले असताना त्यांचा अनुभव सांगताना म्हणाले, वयाच्या अवघ्या पस्तीशीत 'फ्रस्टेट' झालेली पिढी मी बघतोय. आता पुढे काय? कुठले ध्येय साध्य करायचे? असे प्रश्न ही पिढी विचारते. आयटी इंजिनियर असलेले, वर्षाकाठी २५ लाख पगार असलेले, बंगला-गाडीचे मालक असलेल्या या तरुणांनी आयुष्यात प्रत्येक परीक्षेचे ध्येय बाळगून ती उत्तीर्ण केली. हवी ती नोकरीही मिळविली. आयुष्य केवळ यशस्वी होण्यासाठीच जगायचं असतं आणि ध्येय गाठणं अर्थात् 'टार्गेट अचिव्ह' करणं हेच त्यासाठी गरजेचं असतं इतकेच संस्कार ज्या मुलांवर झाले आहेत, त्यांना आता सर्व मनासारखं मिळाल्यावर पुढील 'टार्गेट' काय, हा मुद्दा अस्वस्थ करतो.

प्रेमाची ऊब हेच शाश्वत सूत्र
अमरावती : 'टार्गेट' नसेल तर त्यांना हे सर्वांगसुंदर आयुष्य निरुपयोगी वाटू लागतं. केवळ लोक करताहेत म्हणून मुलांच्या मागे यशस्वीतेचा ससेमिरा लावण्याऐवजी मुलांशी नाते घट्ट करण्यावर पालकांनी भर दिल्यास अनेक समस्या भुर्रर्रदिशी उडून जातील. खरे तर मुलं शाळेत जाण्यापूर्वीपासूनच मुलांशी संवादाच्या माध्यमातून पालकांना एकरूप होता यायला हवं. बालमानसशास्त्रज्ञ सांगतात, मुलांशी त्या काळात घट्ट जुळलेला बंध मग आयुष्यभरात कधीच दगा देत नाही.
ज्यांच्या हातून ही वेळ निघून गेलेली असेल त्यांना त्यांच्या शाळकरी मुलांशी हळुवार संवाद साधणे सुरू करता येईल. दिवसभरातील दमविणाऱ्या कष्टानंतर बाबांनी आणि किचनमधील न संपणाऱ्या कामानंतर आईने मुलांसाठी किमान अर्धा-अर्धा तास काढला तरी पुरे. आई-बाबा दोघे मिळून मुलांशी गप्पा करणार असतील तर त्याहून उत्तम ते काय? दोघांनाही मुलांच्या आवडीच्या मुद्यावर बोलता येईल. तो-ती काही सांगत असेल तर उत्सुक होऊन ऐकता येईल. मुला-मुलींना ज्या विषयात (विषय अभ्यासाबाहेरचाही असू शकेल) रस असेल त्यात पालकांना नानारित्या सहभागी होता येईल. मुलांना खुणावणाऱ्या एखाद्या महत्त्वपूर्ण स्थळाला भेट देता येईल. मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या विषयातील माहितीपर पुस्तके आणता येतील. वृत्तपत्र वाचताना मुलांच्या 'इंटरेस्ट'चे काही वाचनात आले तर मुलांना मुद्दामच ते दाखविता येईल. मुलांच्या विश्वात रमण्यासाठी चालताबोलता करता येणारी ही काही प्रतिनिधीक उदाहरणे. पाल्यांनी कुठल्याशा विषयात जीव लाऊन काम केले असेल तर त्या प्रमाणिक प्रयत्नांसाठीही त्यांची पाठ थोपटता येईल. मेडल मिळावेच, प्रथम क्रमांक यावाच, अशा अटी मुलांची बौद्धिक-मानसिक वाढ अवरुद्धही करू शकते, हेही लक्षात घ्यायला हवे. एखाद्या विषयात रुची येत नसल्याचे मुलांनी सांगितल्यास ते वास्तव स्वीकारता येईल. तो विषय म्हणजे आयुष्य नव्हे हा विश्वास मुलांना देता येईल. माझे आई-बाबा माझ्या सोबत आहेत. कुठलीही गोष्ट मी त्यांना सांगू शकतो, हा विश्वास अशा छोट्या-छोट्या कृतींतून मुलांच्या ठायी घट्ट होईल. हाच विश्वास मुलांना वाममार्गापासून खात्रीलायरित्या दूर सारेल. संवाद साधल्याने जगात काय योग्य नि काय अयोग्य याची जाण मुलांना येणार असेल तर केवढी मोठी ही यशस्वीता?
परवाच्या घटनेतील मुले सुखवस्तू घरातील आहेत. बहुतांश व्यावसायिक घरांतील. आईवडील दिवसभर कामात व्यस्त. चैनीच्या गोष्टी घरी उपलब्ध. मुलांच्या शिक्षणावर हवा तितका पैसा खर्च करण्याची पालकांची तयारी. परंतु एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली वेळ कुणाचकडे नाही. मुलांच्या हृदयात विश्वास निर्माण करू शकणारा अश्वासक संवाद नाही. संवेदनशील वयातील पे्रमाची ही गरज अपूर्ण राहिली की, मुलांच्या मनात अनामिक पोकळी निर्माण होते. आपण दुर्लक्षित आहोत हा हीन भाव तयार होतो. ती पोकळी भरून काढण्यासाठी आणि घरात होणारे दुर्लक्ष आकर्षणात परीवर्तीत करण्यासाठी काही जगावेगळे करण्याकडे कल वळतो. त्यातून मग असे गुन्हे घडतात.
मुलांचे पाऊल चुकले हे खरेच. पण त्यासाठीची जबाबदारी मनोमन पालकांनीच स्वीकारावी. मुलांच्या माथी दोष मढला किंवा मुलांनी केलेल्या कृत्याचे जाहीर समर्थन केले तर ही मुले निर्ढाऊ शकतात. पुढे त्यांचा आदर्श कुठलासा 'डॉन' राहिल्यास नवल वाटू नये.
मुलांबाबत काय तेकायदेशीर सोपस्कार पार पडत राहतील; पण राहून गेलेले मुलांना वेळ देण्याचे, मुलांच्या चांगुलपणावर प्रेम उधळण्याचे कर्तव्य पालकांनी आता निष्ठेने नि अत्यंत आपुलकीने पार पाडावे. या संवेदनशील वयात पाऊल चुकीच्या दिशेने पडू शकणार असेल तर चांगुलपणाच्या दिशेनेही पुन्हा ते परत फिरूच शकेल. आपल्या काळजाच्या तुकड्यांच्या पावलांची दिशा आणि मनातील सुविचारांची सुबत्ता पालकांनी दिलेल्या पे्रमाच्या उबेतूनच निर्माण होते, इतकेच शाश्वत सूत्र लक्षात असू द्या!

- अन् मन वेगळाच मार्ग शोधते
चोर व्हावे, कुटुंबाची समाजाने हेटाळणी करावी, हे ध्येय कुणी मुले आईच्या पोटातून तर घेऊन येत नाहीच ना? गर्भातून आलेला प्रत्येक जीव निरागसता आणि विकासाच्या सर्व उत्तमोत्तम शक्यतांसह जन्माला आलेला असतो. त्याच्या संवेदनशील मनाच्या अकुरांवर जेव्हा असहनशीलतेचे ओझे वाढू लागते, आपण दुर्लक्षित आहोत ही भावना बळावते, त्यावेळी पिचलेले ते मनाचे अंकूर वेगळाच मार्ग शोधते...

Web Title: Parents, do not miss love on the kids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.