पालकांच्या स्वप्नपूर्तीपोटी मुले तणावात !
By admin | Published: July 11, 2017 12:13 AM2017-07-11T00:13:38+5:302017-07-11T00:13:38+5:30
मी ‘कलेक्टर’ बनलो नाही मात्र कलेक्टरचा बाप तर नक्कीच बनेन, अशी भावना पालकांमध्ये बळावू लागल्याने ....
प्राचार्यांचा सूर : ‘लोकमत प्रिन्सिपल मीट’, शहरातील नामांकित शाळांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मी ‘कलेक्टर’ बनलो नाही मात्र कलेक्टरचा बाप तर नक्कीच बनेन, अशी भावना पालकांमध्ये बळावू लागल्याने त्यांचे लहानगे पाल्य तणावात आल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांनी नोंदविले. "लोकमत"च्या प्रिन्सिपल मीटमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या प्राचार्यांनी नोंदविलेल्या या महत्त्वपूर्ण निरीक्षणाने पालकांकडून पाल्यांवर येणाऱ्या अनामिक दबावाला वाचा फुटली आहे.
शिक्षणाचा दर्जा, बदलती शिक्षण प्रणाली, आरटीई कायदा आणि अन्य अनुषंगिक बाबींचा उहापोह करण्यासाठी ‘लोकमत"ने शहरातील विविध संस्थांच्या प्राचार्यांना एका व्यासपीठाखाली आणले. "लोकमत"चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मीटमध्ये पी.आर.पोटे इंटरनॅशनल, अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोल्डन कीड्स इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, के.के.कॅम्ब्रिज स्कूल, नारायणा विद्यालया, भंवरीलाल सामरा हायस्कूल, इंडो पब्लिक स्कूल आणि साक्षरा पॅराडाईज स्कुलचे प्राचार्य उपस्थित होते. आज विद्यार्थ्यांना एकाचवेळी विविध आघाड्यांवर लढावे लागते. त्यांना एकीकडे समाज माध्यमांशी कनेक्ट राहायचे आहे, तर दुसरीकडे पालकांचे स्वप्नही साकार करायचे आहे. १०० टक्के मिळविण्यासाठी अन्य जणांशी स्पर्धा करायची आहे. आपल्याच शाळेचा निकाल १०० टक्के लागला, ही शेखी मिरविण्यासाठी शिक्षकांचा दबावही पाल्यांना झेलावा लागतो. कु टुंबसंख्या मर्यादित झाल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढीस लागतो. संवाद केव्हाचाच हरविला. त्यामुळे ‘बच्चा खुश रहनाही भुल गया है’असे निरीक्षण या प्राचार्यांनी नोंदविले. डिस्ट्रॅक्शनमध्ये वाढ झाल्याचे सांगून पालकच आपल्या पाल्यांच्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीत उमटला.
विद्यार्थ्यांची गुणवाढ झाली असली तरी ते पुढे स्पर्धात्मक परीक्षेत टिकत नसल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्राचार्यांनी नोंदविला सहभाग
या प्रिन्सिपल मीटला शहरातील पी.आर.पोटे इंटरनॅशनल स्कूलच्या मंजुळा नायर, अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य विशाखा नाफडे ,गोल्डन कीड्स इंग्लिश स्कूलच्या कांचण पाठक, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सुधीर महाजन, सेंट फ्रान्सिस स्कूलचे आशिष गणोरकर, के.के.कॅम्ब्रिज स्कूलचे भुपेश केवलरामाणी व किशोर कुमार, नारायणा विद्यालयाच्या भुपेश भेलकर,भंवरीलाल सामरा हायस्कूलचे मोहन राठी, इंडो पब्लिक स्कुलचे योगेश ठाकरे व साक्षरा पॅराडाईज स्कूलच्या कविता केवटकर हे प्राचार्य तथा संचालक मंडळी उपस्थित होती.
प्रत्येकाची ‘सोशल रिस्पॉन्सबिलिटी ’
प्रत्येकाला शिक्षित करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.राजकमल चौकातील विशिष्ट समाजातील मुले असो वा की गरीब वंचिताची मुले त्यांना ‘बेसिक एज्युकेशन’ द्यायलाच हवे, उच्चशिक्षणाचा समाजाला थेट फायदा व्हावा, यासाठी आमच्या संस्थांनी सकारात्मक पुढाकार घेतलाय. भटक्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, असा आश्वासक सूर प्राचार्यांनी व्यक्त केला. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्दात्त भावनेतून समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले.
आरटीई प्रतिपूर्ती अनुदान मिळावे
मागील तीन वर्षांपासून आरटीईतील २५ टक्के प्रवेशाअंतर्गत देण्यात आलेल्या प्रवेशापोटी शैक्षणिक संस्थांना प्रतिपूर्ती अनुदान देण्यात आलेली नाही. खासगी शाळा या स्वयंअर्थसहाय्यित असल्याने त्यांनाही मर्यादा आहेत. त्यामुळे ते थकीत अनुदान त्वरित मिळावे, असा सूर प्रिन्सिपल मीटमध्ये उमटला.