सांसद आदर्शग्राम कळमखारला लागली भ्रष्टाचाराची कीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:19 PM2018-02-25T23:19:09+5:302018-02-25T23:19:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकारण्याकरिता प्रत्येक खासदाराने एक ग्राम दत्तक घेण्याचा उपक्रम देशात सुरू करण्यात आला. याच धर्तीवर खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटातील ‘अतिसंपन्न’ग्राम कळमखारला सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले.
श्यामकांत पाण्डेय ।
आॅनलाईन लोकमत
धारणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकारण्याकरिता प्रत्येक खासदाराने एक ग्राम दत्तक घेण्याचा उपक्रम देशात सुरू करण्यात आला. याच धर्तीवर खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटातील ‘अतिसंपन्न’ग्राम कळमखारला सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले. परंतु तीन वर्षांपासून या गावात केवळ अधिकाऱ्यांच्या सामूहिक बैठकीच झाल्या. याऊलट याच गावातील ग्राम विस्तार अधिकारी (ग्रामसेवक) वैयक्तिक लाभार्थ्यांचे धनादेश देण्याकरिता पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप डॉ. अशोक केशरीलाल भावसार यांनी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्यासोबत पालकमंत्री प्रवीण पोटे कळमखार येथे पंडित दीनदयाल उपाध्याय शुद्ध जल वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आले असता अशोक भावसार यांनी तक्रारीची प्रत त्यांना दिली. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत त्यांनी तयार केलेल्या शौचालयांचे प्रोत्साहन बक्षिसाची रक्कम दोन वर्षांपासून देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याची माहिती देण्यासाठी बीडीओ उमेश देशमुख यांचेकडे शुक्रवारी गेले असता त्यांनी ग्रामसेवकाला दोन हजार रुपये द्या व आपले काम करुन घ्या अशा जबाब दिल्याचेही तक्ररीत नमुद केले आहे.
कमिशन दिल्याशिवाय योजनेचा लाभ नाही
विशेष म्हणून कळमखार या आदर्श सांसद ग्राममध्ये शासकीय योजनेचा लाभ कमिशन दिल्याशिवाय मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. शौचालयाशिवाय धनादेश दिल्या जात नसल्याची ओरड आहे. आदर्श सांसद ग्रामची ही अवस्था असतांना इतर ग्रामपंचायती कल्पना ना केलेलीच बरी ओ. या तक्रारीवर पालकमंत्री काय दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रार मिळताच एका तासात धनादेश वितरण
कळमखार येथील अशोक केशरालाल भवसार यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना तक्रार दिल्यानंतर एकाच तासात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तक्रारर्त्यास १२ हजारांचे धनादेश दिले.
संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांला त्वरित धनादेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठलेही गैरप्रकार आढळल्यास दोषीवर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. उमेश देशमुख,
गटविकास अधिकारी, धारणी