स्वंतत्र भारतात पोपट अद्यापही कैदेत
By Admin | Published: August 13, 2016 11:55 PM2016-08-13T23:55:27+5:302016-08-13T23:55:27+5:30
भारतात पोपट हा वन्यजीव अद्यापही कैदेत आहे. वनाधिकाऱ्यांपासून वनमंत्र्यांपर्यंत वनसंवर्धनासाठी कार्य करीत आहे.
वनविभाग जबाबदार : वन्यजीव कायद्याकडे दुर्लक्ष
अमरावती : भारतात पोपट हा वन्यजीव अद्यापही कैदेत आहे. वनाधिकाऱ्यांपासून वनमंत्र्यांपर्यंत वनसंवर्धनासाठी कार्य करीत आहे. मात्र, या इवल्याशा पोपटांना स्वातंत्र्य देण्यास ही सर्व यंत्रणा निकामी ठरत आहे, ही शोकांतिका अमरावती जिल्ह्यातही पहायला मिळत आहे.
वनसंवर्धनात पोपटाचा मोलाचा वाटा आहे. अन्नसाखळी अबाधित ठेवण्यासाठी पोपट महत्त्वाचे कार्य करते. मात्र, पोपटांना बंदिस्त करून ठेवण्यात येत असल्याने जीवनाच्या अन्नसाखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घरातील शोभा वाढविण्याच्या उद्देशाने पोपटाला पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्याची प्रथा अविरत सुरू आहे. वन्यजीव अधिनियमात मोडणारा हा पक्षी सुंदर, देखणा व गोड बोलत असल्याने नागरिक पोपटाला बंदिस्त करून ठेवतात. बहुतांश घरात पोपटाला पाळीव पक्षी बनविण्यात आले आहे. पोपटाची काही ठिकाणी छुप्या मार्गाने तर काही ठिकाणी सर्रासपणे विक्री केली जाते. हा गुन्हा मानला जातो. मात्र वनमंत्र्यांसह, वनाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ हिंस्त्र पशूविषयी वन्यजीव कायद्यांची अमंलबजावणी केली जाते. मात्र, या इवल्याशा पोपटाला आजपर्यंत वनविभाग स्वातंत्र्य देऊ शकले नाही. जिल्ह्यात शेकडो पक्षीप्रेमी आहेत, मात्र, आजपर्यंत पक्षीपे्रंमींनी पोपटाच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेतला नाही. (प्रतिनिधी)