चार तालुक्यात भूजलस्थितीत अंशत: कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:36+5:302021-07-04T04:09:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने पुनर्भरण झाल्यामुळे भूजलस्तरात वाढ झालेली होती. यंदा जून महिन्यात चार तालुक्यातील भूजलस्थितीत ...
अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने पुनर्भरण झाल्यामुळे भूजलस्तरात वाढ झालेली होती. यंदा जून महिन्यात चार तालुक्यातील भूजलस्थितीत अंशत: घट झाली असली तरी दहा तालुक्यातील भूजलात सरासरी पातळीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. भूजल सर्व्हेक्षण (जीएसडीए) विभागाद्वारा जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीच्या आधारे हे निरीक्षण नोंदविले आहे.
मागच्या वर्षी ८२९.९० मिमी म्हणजेच ९६.१८ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर परतीचा पाऊस व डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरूच होता. यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले होते. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसायला लागला आहे. यंदा मार्चपर्यंत सर्वच तालुक्याच्या भूजलात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. ‘जीएसडीए’द्वारा पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या आधारे निरीक्षण नोंदविले. जून महिन्यात मात्र, तिवसा चांदूर बाजार, अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील भूजलात अंशत: कमी आलेली आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या नोंदीनुसार सद्यस्थितीत अमरावती तालुक्यात सरासरी भूजल पातळीच्या ०.०१ मीटर जास्त, भातकुली ०.२६, नांदगाव खंडेश्वर १.२२, चांदूर रेल्वे ०.९७, मोर्शी१.८५, वरुड १.३८, अचलपूर ०.३३, धारणी १.४०, चिखलदरा १.०१, व धामणगाव तालुक्यात ०.६८ मीटरने भूजलातील पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे व पाच वर्षात यंदा प्रथमच भूजलासाठी सकारात्मक चित्र नोंदविले आहे.
बॉक्स
रेड झोनमधील भूजलात वाढ
भूजलाचा वारेमाप उपसा झाल्यामुळे रेड झोनमध्ये आलेल्या मोर्शी व वरूड तालुक्यात यंदा सुखद चित्र आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १.८५ व १.३८ मि.मी वाढ झालेली आहे. भूजलाचे झालेले पुनर्भरण, जलसंधारणाची कामे व अनधिकृत बोअरला प्रतिबंध केल्यामुळे या तालुक्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.
बॉक्स
खारपाणपट्टा भूजलातील घट चिंताजनक
जिल्ह्यात खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या तालुक्यातील भूजलात यंदा घट झालेली आहे. या तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे भूजलाचा उपसा झालेला तरीही जिल्ह्यात सर्वात जास्त दर्यापूर तालुक्यात २.१२ मी. व अंजनगाव तालुक्यात ०.७० मी भूजलात आलेली तूट चिंताजनक आहे. याशिवाय भातकुली तालुक्यात मात्र ०.२६ मी. वाढ झालेली आहे.