पॅसेंजर बंद, गाव, खेड्यातील प्रवास महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:11 AM2021-01-04T04:11:56+5:302021-01-04T04:11:56+5:30
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत ...
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच होरपळ होत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
बडनेरा रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने या स्थानकावरून मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या धावतात. सध्या बडनेरा रेल्वे स्थानकाहून अप आणि डाऊन मार्गावर कोविड स्पेशल ट्रेन धावत आहेत. मात्र, बडनेरा येथून चांदूर रेल्वे, धामणगाव, मूर्तिजापूर, अकोला आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्याने बाहेरगावी शिक्षण घेणारे, नोकरीवर असणारे तसेच विविध शासकीय कार्यालयासह बॅंकेत काम करणाऱ्यांसह गोरगरिबांची होरपळ होत असून, जादा प्रवासभाडे देऊन त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत असल्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी आहे.
-----------------
पुणे, मुंबई रेल्वेगाड्या सुरू
सध्या १० ते १२ स्पेशल गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून धावतात. त्यामध्ये विदर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, नागपूर ते पुणे एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या धावतात. मात्र, या गाड्यांमध्ये आरक्षण असल्याशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
---------------------
नागपूर-भुसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी बंदच
नागपूर ते भुसावळ तसेच भुसावळ ते नागपूर, अमरावती ते नागपूर, अमरावती ते भुसावळ आदी चार प्रवासी रेल्वेगाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बंद आहेत. त्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
रेल्वेत आरक्षणाविना प्रवासाला बंदी आहे. एका सीटवर तीन प्रवासी असे धोरण असल्याने अप-डाऊन शक्य नाही. खासगी वाहनाने जास्त खर्च लागत असून, पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
------------------
गरीब प्रवाशांसमोर आर्थिक संकट
पॅसेंजर रेल्वे गाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून, चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्यांअभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून, वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.