पाच चेकपॉर्इंटवर प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:51+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व अन्य लक्षणे याद्वारे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्थानकांवर पुणे, मुंबई, नागपूर येथून येणाºया प्रवाशांंची तपासणी होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या एमएसआरटीसी किंवा खासगी वाहनातील प्रवाशांंची बडनेरा, रेल्वे व बसस्टेशन, गुरुकुंज (ंमोझरी), चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या पाच चेक पॉइंटवर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. २४ बाय ७ या काळात तीन शिफ्टमध्ये हे पथक उपस्थित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व अन्य लक्षणे याद्वारे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्थानकांवर पुणे, मुंबई, नागपूर येथून येणाºया प्रवाशांंची तपासणी होईल.
बडनेरा बसस्थानकावर मुंबई, नाशिक, यवतमाळ, अकोला मार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी महापालिकेचे वैद्यकीय पथक करणार आहे. या चारही पथकांमध्ये प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, एनएम व एमपीडब्लू राहणार आहे. याव्यतिरिक्त नागपूर मार्गे येणाºया प्रवाशांची गुरुकुंज (मोझरी) येथील बस स्थानकामध्ये वैद्यकीय तपासणी केली जाईल.
जिल्हा ग्रामिणच्या पथकामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहायक राहतील याव्यतिरिक्त पथकांच्या सोबतीला महसूल विभागाचा प्रत्येकी एक कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा राहणार असल्याची माहिती आहे.
गुरुकुंज (मोझरी) व बडनेरा बसस्थानकाची जबाबदारी विभागीय आगार नियंत्रक श्रीकांत गभणे, बडनेरा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे स्टेशनची जबाबदारी स्थानिक स्टेशन मास्तर तसेच वैद्यकीय तपासणीसाठी गुरुकुंज, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पॉइंटकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमाळे, बडनेरा बस व रेल्वे स्टेशनकरिता महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व गुरुकुंज येथील पॉइंटवर पोलीस विभागाची जबाबदारी अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्याकडे राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे. दैनंदिन तपासणी अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला सादर करावा लागणार असल्याची माहिती आरडीसी नितीन व्यवहारे यांनी दिली.
बँका अन् एटीएम स्वच्छ ठेवा
जिल्ह्यातील बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व बँक व्यवस्थापनाला गुरुवारी दिले. नागरिकांनी आॅनलाईन बँकींगचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी जनजागृती करावी. त्याचप्रमाणे एटीएम मशीनला वारंवार हात लागत असल्याने त्यादृष्टीने मशीनची स्वच्छता ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
चार शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १४ मार्च रोजी दिले आहेत. मात्र, शिवाजी आयडीयल स्कूल, महर्षी इंग्लिश स्कूल, सेंट फ्रांसिस इंग्लिश स्कूल व साक्षरा इंग्लिश स्कूल सुरू असल्याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. त्यामुळे २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी बुधवारी दिले आहेत.
आंतरराज्यीय सीमेवर लावणार चेकपॉइंट
अन्य राज्यातून येणाºया वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आता आंतरराज्यीय सीमेवर आता चेक पॉइंट स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य तपासणी पथकाचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. जिल्ह्यात सर्व मार्गाने प्रवेश करणाºया वाहनांतील प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले.
सरपंच, ग्रामसेवकांवरही जबाबदारी
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू झाल्याने प्रतिबंधक पाययोजनांसाठी गावागावांतील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरही आता जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावात स्वच्छता ठेवण्यासोबत परराज्यातून किंवा जिल्ह्यातून नागरिक आल्यास, त्याला तपासणीसाठी निर्देशित करावे लागणार आहे.
२४ नागरिकांचे थ्रोट स्वॉब निगेटिव्ह
सीएसद्वारे बुधवारी २१ व व तत्पूर्वी तीन थ्रोट स्वॅब असे २४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याच अहवाल गुरुवारी उशीरा निगेटिव्ह प्राप्त झाला. गुरुवारी ११ नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याबाबत अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, बसस्थानक, चेकपोस्ट आदी ठिकाणी रँडम तपासणीही करण्यात येणार आहे.