माकडाने उलटविला ऑटो, अपघातात प्रवासी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 04:47 PM2022-07-20T16:47:00+5:302022-07-20T16:50:38+5:30
माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले. ऑटोचालकाने ब्रेक लावले असता, ऑटो उलटला. त्यामुळे केदार, त्यांची पत्नी व अन्य प्रवासी खाली कोसळले.
अमरावती : भरधाव ऑटोसमोर माकड आल्याने झालेल्या अपघातात प्रवासी ठार झाल्याची घटना परतवाडालगतच्या कोठारा दवाखान्याजवळ घडली. ११ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात ज्ञानेश्वर केदार (५०) यांचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर केदार व त्यांची पत्नी हे एमएच २७ बीडब्ल्यू १७९५ या ऑटोने परतवाड्याकडे जात होते. दरम्यान, कोठारा दवाखान्यासमोर अचानक एक माकड ऑटोसमोर आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले. ऑटोचालकाने ब्रेक लावले असता, ऑटो उलटला. त्यामुळे केदार, त्यांची पत्नी व अन्य प्रवासी खाली कोसळले.
ज्ञानेश्वर केदार यांच्या डोक्याला, छातीला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी १८ जुलै रोजी सायंकाळी ऑटोचालक अ. जाफर अ. सादिक (३१, शिरजगाव कसबा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.