पॅसेंजर गाड्या बंद असल्याने, रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:15+5:302020-12-26T04:11:15+5:30
विशेष गाड्या सुरू, प्रवाशांना आर्थिक फटका श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही ...
विशेष गाड्या सुरू, प्रवाशांना आर्थिक फटका
श्यामकांत सहस्त्रभोजने
बडनेरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर न आल्याने असंख्य प्रवाशांना आर्थिक फटका सहन करून सुकर प्रवास होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाला त्या दिशेने सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.
जंक्शन रेल्वे स्थानक असणाऱ्या बडनेरातून शेकडो प्रवासी पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करीत होते. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या लाटेमुळे सर्वत्र रेल्वे प्रवासी गाड्या ठप्प झाल्या. काही दिवसांनंतर श्रमिक गाड्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. दिवाळीपूर्वी विशेष व फेस्टिवल प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या. बडनेरा रेल्वे स्थानकाहून गावखेड्यांवर जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने प्रवाशांना आर्थिक संकटासह मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. पॅसेंजर गाड्यांचे भाडे अत्यल्प आहे. गोरगरिबांना प्रवास करणे परवडणारे आहे. आता अधिक मोबदला देऊन प्रवास करावा लागतो आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाहून अकोला, नागपूर, नरखेड या मार्गाने पॅसेंजर रेल्वे गाड्या धावीत होत्या. छोट्या रेल्वे स्थानकांवर केवळ पॅसेंजर गाड्या थांबतात. मोठा प्रवासी वर्ग असणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना कोरोना संसर्गाच्या नियमावलीत बसवून प्रवाशांच्या सेवेत सुरू करणे अत्यावश्यक झाले आहे. स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. एक्सप्रेस गाड्यांचे महागड़े भाडे व त्यात आरक्षणाचा अधिकचा भार गोरगरीब प्रवाशांना न झेपणारा ठरला आहे.
बॉक्स:
विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू
सध्या बडनेरा रेल्वे स्थानकाहून १८ ते २० विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस, गीतांजली, हावडा- अहमदाबाद, अमरावती- पुणे, पुरी- अहमदाबाद, अजनी- पुणे यासह इतरही प्रवासी गाड्या ये-जा करीत आहे.
बॉक्स
बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या
भुसावळ- वर्धा, भुसावळ- नागपूर, भुसावळ- नरखेड या पॅसेंजर गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून ये-जा करीत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या आता बंद आहेत.
बॉक्स
गरीब प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका
पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे गोरगरीब प्रवाशांना स्पेसल ट्रेन, खासगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेसने महागडे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. यांच्या तुलनेत पॅसेंजर रेल्वे गाड्यांची भाडे आकारणी गोरगरीब प्रवाशांना परवडणारी आहे. दुपटीचा फरक असल्याचे तिकीट दरावरून लक्षात येते.
* प्रतिक्रिया *
कोरोना संसर्गाला गृहीत धरूनच सर्वत्र नियम पाळून कामकाजाला सुरुवात झाली आहे. स्पेशल गाड्या प्रमानेच पॅसेंजर रेल्वे गाड्यादेखील सुरू करण्यास काही हरकत नाही. प्रवासी स्वतःची काळजी बाळगूनच प्रवास करीत आहे.
- विलास वाडेकर, सदस्य, डीआरडीसीयू