पॅसेंजर गाड्यांची गजानन भक्तांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:09+5:302021-01-21T04:13:09+5:30
एक्स्प्रेस सुरू पॅसेंजर केव्हा? , गाव, खेड्यातील प्रवाशांची मागणी बड़नेरा : कोरोनाचा संसर्ग ओसरू लागल्याने रेल्वे प्रवासी संख्येत वाढ ...
एक्स्प्रेस सुरू पॅसेंजर केव्हा? , गाव, खेड्यातील प्रवाशांची मागणी
बड़नेरा : कोरोनाचा संसर्ग ओसरू लागल्याने रेल्वे प्रवासी संख्येत वाढ होत आहे. पॅसेंजर गाडी सुरू व्हावी, अशी मागणी शेगाव भक्तांसह गाव, खेड्यातील प्रवाशांची आहे. एक्स्प्रेस सुरू केल्या आता पॅसेंजर सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने या दिशेने पाऊल उचलणे गरजेचे आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
कोरोनाची लागण सुरू होताच मार्च महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. या गाड्यांना मोठा प्रवासी वर्ग आहे. रेल्वे प्रशासनाने हळूहळू बऱ्याच एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. प्रवासी वर्गदेखील वाढता आहे. अमरावती जिल्ह्यातून शेगाव येथील गजानन महाराज संस्थानला दर्शनासाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. कोरोना संसर्ग ओसरू लागल्याने शेगाव येथे जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे; मात्र या सर्वांना एसटी महामंडळाच्या बस किंवा एक्सप्रेस रेल्वे गाड्याने ये-जा करावी लागत आहे. पर्यायाने अधिक पैसे मोजावे लागत आहेत. शेगाव भक्तांमध्ये पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्या पाहिजेत, अशी मागणी जोर धरून आहे त्याच प्रमाणे सर्वच गाव, खेड्यांवर ही गाडी थांबत असल्याने या सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी पॅसेंजर गाडी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे बोलले जात आहे. पुढे शाळा, महाविद्यालये सुरू होणार आहेत. मोठ्या संख्येत गाव खेड्यावरील विद्यार्थी बडनेरा किंवा अमरावतीत शिक्षणासाठी येत असतात. यांनादेखील पॅसेंजर गाडीचा प्रवास सोयीचा असतो. तेव्हा पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मोठ्या प्रमाणात असणारी मागणी लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग नियमावलींचे पालन करून एक्स्प्रेस गाड्या सुरु झाल्यात, तीच नियमावली पॅसेंजर रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांना देखील लागू करता येऊ शकते. सध्या नागपूर- भुसावळ या दरम्यान एक पॅसेंजर गाडी सुरू केल्यास सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बाब ठरू शकते.
-------------------
पॅसेंजर बंद असल्यामुळे शेगाववारी महागली आहे. सामान्य भक्तांना गजानन महाराजांचे दर्शन न परवडणारे ठरत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक बाजू लक्षात घेता पॅसेंजर गाडी सुरू करणे काळाची गरज आहे.
- मुकुंद वानखडे, भक्त, बडनेरा.