प्रवासी वाहतूक ‘ओव्हरलोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:51 PM2018-03-11T22:51:08+5:302018-03-11T22:51:08+5:30
शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे. शहर बस व आॅटो प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक होत असतानाही वाहतूक पोलीस व महापालिका यंत्रणा गप्प आहे, ही धोक्याची घंटा असून, प्रवाशांच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहराच्या वर्दळीत धावणाºया शहर बस व आॅटोमध्ये क्षमतपेक्षा अधिक वाहतूक सुरु असताना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अमरावती-बडनेरा मार्गावर हे दृष्य पाहताना अनेकांच्या भुवय्या उंचावत आहे. शहर बसच्या लटकून प्रवासी वाहतूक धोकादायक ठरत असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यातच आॅटो चालकांचाही मनमानी कारभार वाहतुकीला बळ देत आहे. शहरात २५ च्याजवळपास शहर बसेस असून पाच हजारांवर आॅटो आहेत. दिवसभराच्या वर्दळीत शहरात बसेस व आॅटोंचे आवागमन सर्वाधिक आहे. पायी व दुचाकीस्वारांना बस व आॅटोच्या दुरूनच जावे लागत आहे. बस व आॅटो कुठे व कोणत्या क्षणी थांबेल, याचा अंदाज नागरिकांना येत नसल्याने अपघात घडत आहे. बस व आॅटो क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून जात असताना एकीकडे झुकल्या जातात, मात्र, त्याचीही पर्वा केली जात नाही. ही वाहतूक जीवघेणी ठरू शकते, याची पुसटशी कल्पनाही बस व आॅटो चालकांना नाही. असे असतानाही वाहतूक पोलीस, संबंधित ठाण्याच्या हद्दीतील पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.