परतवाडा बसस्थानकातून पळविले जातात प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:47+5:302021-03-14T04:12:47+5:30
पोलिसांचा धाक संपला, एसटी प्रशासनाला कुणी जुमानेना नरेंद्र जावरे परतवाडा : खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा ...
पोलिसांचा धाक संपला, एसटी प्रशासनाला कुणी जुमानेना
नरेंद्र जावरे
परतवाडा : खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा पाहता बसस्थानक परिसरात प्रवासी पळविण्याचा खेळ बंद झाला असेल, असे सामान्यांना वाटत असेल, तर ते सर्वथा चूक आहे. तो जीवघेणा खेळ राजरोसपणे सुरूच आहे. बसस्थानकाच्या दोनशे मीटर अंतरापुढे खासगी वाहने लावावीत, हा नियम पायदळी तुडवला जात असून, त्या गळेकापू स्पर्धेतून मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती वर्तविली जात आहे.
पूर्वीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळात प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे एसटीचे अर्थचक्र थांबले. त्यामुळे या बंद काळात चालक - वाहकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे आजही बस गाड्यांमध्ये डिझेल टाकण्याची ऐपत महामंडळाची नाही. या सर्व संकटांचा सामना करीत असताना खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी आपली वाहने थेट बसस्थानक परिसरात लावून प्रवासी पळविण्याचा घाट घातला आहे. याच स्पर्धेतून एका ट्रॅव्हल्सवर प्रचंड दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. ट्रॅव्हल्स संचालकांची ती कृती प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरली आहे. दुसरीकडे सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली अरेरावी कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न जुळ्या शहरातील नागरिकांना पडला आहे.
बॉक्स
शेकडो तक्रारी, केराची टोपली
परतवाडा शहरातून अमरावती, नागपूर, अकोला, पुणे, मध्यप्रदेशच्या खंडवा, इंदूर, बैतूल अशा दूरपर्यंत खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावतात त्यासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. परतवाडा बसस्थानकापुढे या खासगी ट्रॅव्हल्स लावून प्रवासी पळविले जातात. यासंदर्भात परतवाडा आगारातून पोलीस ठाणे, आरटीओ व प्रशासनाकडे शेकडो तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुठल्याच प्रकारे कारवाई केली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे.
बॉक्स
तोडफोडीनंतरही दादागिरी सुरूच
प्रवासी नेण्यासाठी आपला क्रमांक आहे, यावरूनच हा वाद शिगेला पोहचला होता. मोठ्या प्रमाणात दगडफेक करीत ट्रॅव्हल संचालकांनी दहशत पसरली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन जागृत झाले आणि वाहन २०० मीटर दूर लावल्या गेली. परंतु, दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा परिस्थिती “जैसे थे‘ असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी पहायला मिळाले. त्यामुळे आरटीओ व पोलिसांची हप्तेखोरी की धाक संपला? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
बॉक्स
टप्पा वाहतूक कोणाच्या आदेशाने?
परतवाडा अमरावती या मार्गावर सर्वाधिक प्रमाणात खासगी ट्रॅव्हल दिवसभर धावत आहेत. ही टप्पा वाहतुकीची परवानगी आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याने ट्रॅव्हल संचालकांना दिली, हे मात्र अनुत्तरित आहे. याच कारणातून परतवाड्यात मोठा राडा होण्याची भीती वर्तवली जात असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे.
पान २ ची बॉटम