इंदूरकडे जाणाºया प्रवाशांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:21 PM2017-10-31T23:21:21+5:302017-10-31T23:21:40+5:30
एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे....
सुदेश मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक गावांचा विकास मंदावला असल्याची ओरड होेत आहे. जे अंतर रेल्वेने २०० रुपयांत पार करता येते, त्यासाठी प्रवाशांना आठशे ते हजार रुपये खर्च करावा लागत आहे.
इंदूरजवळील महूपासून खंडवाकडे येणाºया चोरल स्टेशनपर्यंत भूसंपादनात येणारे अडथळे आणि पहाडी क्षेत्रात ट्रॅक निर्मितीची समस्या यामुळे हे काम सध्या रखडले आहे. पश्चिम विदर्भातील रेल्वे मार्गावर एक प्रमुख स्टेशन असलेल्या अकोलापासून अकोटमार्गे इंदूर मध्यप्रदेशला जाणारा व प्रवाशांच्या खिशाला परवडणारा हा रेल्वेमार्ग यामुळे बंद पडला आहे. महू ते खंडवा मार्गावर पाताळपाणी या स्टेशनपासून चोरल स्थानकापर्यंत ही रेल्वे नवीन मार्गाने वळविण्यात येत आहे व त्यामुळे १५ किलोमीटरचे अंतरसुद्धा वाढले आहे.
महू ते खंडवा हे अंतर जुन्या मार्गाने ११८ किलोमीटर आहे. मात्र नव्या वळणामुळे १३३ किलोमीटर होत आहे. नवीन वळणमार्ग करताना ही रेल्वे लाइन पाताळपाणीपासून बेडीदा गावाकडे वळविण्यात येते. हे वळण ४० किलोमीटर होते. जुन्या मार्गाने ते २५ किलोमीटर होते. त्यामुळे हा मार्ग १५ किमीने वाढला आहे. यासाठी किती वेळ लागेल? भूसंपादन प्रक्रिया कधी संपेल? याबाबत रेल्वे विभाग मौन बाळगून असल्याने दोनशे रुपयांत या मार्गे इंदूरला जाणाºया प्रवाशांना ट्रॅव्हल्सने पाचशे रुपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
सर्वोत्कृष्ट रेल्वे इंजिनीअरिंगचा नमुना
ब्रिटिशकालीन रेल्वेमार्ग आगळीवेगळी सिग्नल सिस्टीम असलेला पूर्णा-अकोला ते महू इंदूर मीटरगेज रेल्वेमार्ग शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने बांधला होता. सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलातून नद्या-डोंगरांचे अडथळे दूर करीत बांधलेला हा मार्ग तत्कालीन उत्कृष्ट इंजिनीअरिंगचा नमुना आहे.
इंदूर ही रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची मध्य भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. यामुळे तालुका व लहान जिल्ह्यातील व्यापारी इंदूरहून व्यवहार करतात. अकोला ते महू मार्ग सुरू झाल्यास योग्य सोय होईल. बाजार विकसित होतील.
- ब्रिजमोहन झंवर,
अध्यक्ष, व्यापारी संघ, अंजनगाव
सध्या अंजनगाव किंवा पश्चिम विदर्भातील नागरिकांना ट्रॅव्हल्सनेच इंदूरला जावे लागते. विशेषत: मालवाहतूक करताना मोठा खर्च होतो. भाड्यापोटी होणारा मोठा खर्च रेल्वेमार्ग झाल्यास वाचू शकतो. प्रवाशांना बसणारा भुर्दंड वाचू शकेल.
- महेंद्र शिंदी जामेकर,
अंध्यक्ष, ग्राहक पंचायत, अंजनगाव