उत्तीर्ण विद्यार्थिनीला नापासची गुणपत्रिका
By admin | Published: April 19, 2015 12:20 AM2015-04-19T00:20:44+5:302015-04-19T00:20:44+5:30
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी उत्तीर्ण असतानाही तिला अनुत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एक वर्षाचे नुकसान : विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
अमरावती : अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी उत्तीर्ण असतानाही तिला अनुत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनाला एका वर्षाचे नुकसान सहन करावे लागले. या प्रकारामुळे पुन्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भांत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरु मोहन खेडकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत असलेली रुचा चंद्रकांत भोपाळे हिने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ साठी सिपना महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिने प्रथम 'ग्रुप बी'ची परीक्षा हिवाळी २०१३ मध्ये दिली होती. त्यामध्ये रुचा सर्वच विषयात नापास झाली. त्यानंतर तिने रसायनशास्त्र विषय पुर्नमुल्याकंनकरिता टाकला होता. त्यामध्ये ती उर्तिर्ण सुध्दा झाली. त्यानंतर तिने उन्हाळी परीक्षा २०१४ ला उर्वरित गृप बीचे तीन विषय आणि गृ्रप ए ची परिक्षा दिली. तेव्हा सुध्दा ती सातही विषयात नापास झाली. ती प्रथम वर्षाकरिता नापास झाल्याने तिला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकला नाही.
उर्वरित विषय काढण्याकरिता रुचाने पुन्हा हिवाळी २०१४ ची परिक्षा दिली. त्यावेळी तिला ग्रुप बीची गुणपत्रिका मिळाली नाही. गुणपत्रिकेसाठी रुचाने विद्यापीठात अर्ज केला होता. मात्र, विद्यापीठाने रुचाचे ग्रुप बीचे सर्व विषय उन्हाळी २०१४ मध्येच निघाल्याचे सांगून तिला उर्तिर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली. त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात अनुपस्थिती दर्शविलेल्या ठिकाणी २६ गुण देऊन उर्वरित विषयांमध्ये गे्रस मार्कींगचे समान विभाजन करुन तिला उत्तीर्ण करण्यात आले.
या प्रकारामुळे रुचा भोपाळेला मानसिक तणावात आली होती. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे तीचे एका वर्षांचे नुकसान सुध्दा झाले आहे.
याप्रकाराची कुलगुरुंनी जबाबदारी स्वीकारून चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्याथी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भांचे निवेदन अभाविप अमरावती महानगराचे अध्यक्ष स्वप्निल पोतदार यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी कुलगुरु मोहन खेडकर यांना सादर केले. (प्रतिनिधी)