मुदतवाढ संपलेल्या संस्थाविषयी पेच कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:56+5:302021-01-08T04:35:56+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची तिसरी मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपुष्टात आली. मात्र, या संस्थांसाठी कुठलेच पत्र ...
अमरावती : जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची तिसरी मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपुष्टात आली. मात्र, या संस्थांसाठी कुठलेच पत्र वा दिशानिर्देश सहकार विभागाकडून प्राप्त नसल्यामुळे संस्थास्तरावर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे.
मार्च ते एप्रिल महिन्यातील कर्जमाफीची प्रक्रिया व त्यानंतर आतापर्यंत असलेला कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यात डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ६४८ सहकारी संस्थांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम (क) नुसार तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती व आता नियमानुसार अधिक मुदतवाढ देता येत नसल्याने जानेवारी महिन्यापासून निवडणुका घेण्याविषयी सहकार प्राधिकरण सकारात्मक आहे. मात्र, मुदतवाढ दिलेल्या संस्थांची अखेरची मुदतही ३१ डिसेंबरला संपुष्टात आलेली असताना शासनाकडून कुठल्याच सूचना नसल्याने संबंधित विभागासह संस्थादेखील संभ्रमात आहे. या संस्थांची मुदतवाढ संपली असून, निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या परिस्थितीत निवडणूक घ्यायची कशी, याबाबत शासनस्तरावर दोन मतप्रवाह असल्याने अद्याप गाईडलाईन आलेल्या नाहीत. २४ तासांत याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
१५ जानेवारीपश्चात निवडणूक!
जिल्ह्यासह राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे व १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या प्रक्रियेमध्ये सहकार विभागाचे कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे सहकारात मुदत संपलेल्या संस्थाची निवडणूक जाहीर झाल्यास, ती १५ जानेवारीनंतरच होईल, असे सांगण्यात आले. तूर्तास सहकार विभाग व संबंधित संस्थांना शासनादेशाची प्रतीक्षा आहे.
कोट
जिल्ह्यातील ६४८ सहकारी सहकारी संस्थांची मुदतवाढ ३१ डिसेंबरला संपुष्टात आलेली आहे. एक वा दोन दिवसांत याविषयीचे आदेश अपेक्षित आहेत. त्यानुसार कार्यवाही करू.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)