मेळघाटातील घुंगरू बाजारात राजकुमार पटेलांनी बासरीच्या तालावर धरला आदिवासी नृत्यावर ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 07:23 PM2021-11-12T19:23:32+5:302021-11-12T19:24:30+5:30
Amravati News आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्णपणे गोंडी लोकांसारखे वस्त्र आणि आभूषण परिधान करून मेळघाटातील आठवडी बाजारात हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर त्यांनी बासुरी हातात घेऊन गोंडी बांधवांसोबत नृत्याचा फेरही धरला.
अमरावती : मेळघाटातील सुप्रसिद्ध घुंगरू बाजाराचा समारोप धारणी येथील आठवडी बाजारात शुक्रवारी झाला. आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्णपणे गोंडी लोकांसारखे वस्त्र आणि आभूषण परिधान करून आठवडी बाजारात हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर त्यांनी बासुरी हातात घेऊन गोंडी बांधवांसोबत नृत्याचा फेरही धरला. त्यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली.
आमदार राजकुमार पटेल आपल्या अनोख्या स्वभावामुळे सर्वांना आश्चर्यात टाकणारी हस्ती, म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन सर्वसामान्यांची अडचण दूर करणे, याचा तर जणू त्यांनी संकल्पच घेतलेला आहे. वेळोवेळी येणाऱ्या उत्सवातसुद्धा त्यांचे विशेष महत्त्व असते.
यापूर्वी तालुक्यातील विविध मोठ्या गावांत आठवडी बाजार भरत. त्या-त्या बाजारात घुंगरू बाजाराची रेलचेल होती. त्या अनुषंगाने शनिवारी - कळमखार, रविवारी - चाकर्दा, सोमवारी - बैरागड आणि बिजूधावडी, मंगळवारी - टिटंबा, बुधवारी - हरिसाल आणि सुसर्दा, तर शुक्रवारी धारणी येथील आठवडी बाजाराला घुंगरू बाजाराचे समारोप संपन्न झाले.
घुंगरू बाजारात परिसरातील १७० गावांतील महिला, पुरुष आणि लहान मुले बाजार बघण्यासाठी एकच गर्दी करतात. आजच्या बाजारात विशेष करून गोंड समाजातील गुरे चारणारे बांधव यांचा विशेष उत्सव म्हणून घुंगरू बाजाराची ओळख आहे. डोळ्याला काळा चष्मा, पांढरी धोती, पांढरा सदरा, काळा कोट, हातात बासुरी, डोक्यावर तुर्रेदार पगडी या सर्वांचे आभूषण परिधान करून ढोलकीच्या तालावर आदिवासी गोंडी बांधव नृत्य करतात. यावेळी त्यांच्यासोबत असणारी काही मंडळी हातात कपड्याची झोडी करून घरा-घरातून आणि दुकानांतून आपला हक्क म्हणजे काही पैसे किंवा वस्तू स्वरूपात प्राप्त करतात.
गुरुवारी धारणी येथील ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांनी कर्मचाऱ्यांसह सकाळपासून वाहतूक व्यवस्था सांभाळली. धारणी शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आतमध्ये वाहनांना परवानगी न देता त्यांना ठराविक स्थळी पार्किंग व्यवस्था केली होती. जेणेकरून बाजारात वाहनांची गर्दी टाळता येईल, अशी चोख वाहतूक व्यवस्था बेलखडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली.