ग्राफीनच्या पेस्टचे पेटेंट; अमरावती विद्यापीठातील पहिले संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 PM2019-02-28T12:49:06+5:302019-02-28T12:49:34+5:30
ग्राफीन या कार्बन संवर्गातील आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या संयुगाच्या नव्या पद्धतीचे पेस्ट (अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ ग्राफीन पेस्ट) या आविष्कारासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक संदीप आनंदराव वाघुळे यांना पेटेंट मंजूर झाले आहे.
गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्राफीन या कार्बन संवर्गातील आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या संयुगाच्या नव्या पद्धतीचे पेस्ट (अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ ग्राफीन पेस्ट) या आविष्कारासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक संदीप आनंदराव वाघुळे यांना पेटेंट मंजूर झाले आहे. हे पेटेंट अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिले ठरले आहे.
भारत सरकारच्या पेंटेट प्रमाणपत्र कार्यालयात सन २०१२ मध्ये संदीप वाघुळे यांनी आपल्या आविष्काराला पेटेंट मिळवण्याकरिता अर्ज सादर केला होता. या आविष्काराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तपासणी, चाचण्या आॅनलाइन घेण्यात आल्यात. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१९ रोजी या आविष्काराचे अधिकार (पेटेंट) संदीप वाघुळे यांना मंजूर करण्यात आले आहे. ग्राफीनच्या संशोधनाबद्दल भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार अलीकडे २०१० मध्ये अँॅड्र्यू जीम व कॉन्स्टनटाइन नोवोसेलव्ह या युनायटेड किंगडमच्या संशोधकांना मिळाले. याच विषयात संशोधन करीत असलेले संदीप वाघुळे यांनी ग्राफीन हा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत सर्वप्रथम २०११ मध्ये तयार केला. संशोधनादरम्यान ब्लॉकिंग इलेक्ट्रोडची आवश्यकता त्यांना भासली. ग्राफीन हा पदार्थ तयार असल्यामुळे त्यामध्ये योग्य बाइंडर घालून पेस्ट तयार करून पाहिले. ही पेस्ट फोटोवोल्टेक सेलचे ईलेक्ट्रोड, सुपरकॅपिसिटरचे इलेक्ट्रोड आणि रिमोट कंट्रोलचे इलेक्ट्रोड म्हणून उत्तमरीत्या वापरण्यात येऊ शकते, हे स्पष्ट झाले. वाघुळे यांनी ग्राफीन हा पदार्थ गॅस सेंसरच्या वापरासाठी तयार केला होता. परंतु, तो इलेक्ट्रोड म्हणून संशोधनातून वापरण्यात आला. अशा पद्धतीने अपघातानेच ग्राफीन पेस्टचा आविष्कार लागला.
जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण
संदीप वाघुळे हे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील मार्कंडा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण मार्कंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतले. येथूनच माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालय आणि आचार्य पदवी शासकीय विदर्भ महाविद्यालयातून पूर्ण केली, हे विशेष.