पथ्रोट पोलीस ठाण्याच्या वाहनाला ‘दे धक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:55+5:302021-04-14T04:11:55+5:30
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या खांद्यावर ३२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यासाठी देण्यात आलेले वाहन चोरांऐवजी ...
पथ्रोट : स्थानिक पोलीस ठाण्याच्या खांद्यावर ३२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यासाठी देण्यात आलेले वाहन चोरांऐवजी पोलिसांनाच घाम फोडत आहे. कुठल्याही वेळी बंद पडल्यानंतर त्याला धक्का देण्याची वेळ पोलीस व परिसरातील नागरिकांवर येते.
ऐंशी हजार लोकसंख्या व पाच बीटमध्ये पथ्रोट ठाण्याचा कारभार चालतो. आगामी सण-उत्सवांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी पोलिसांना रात्र-अपरात्री गस्त (पेट्रोलिंग) घालावी लागते. अशावेळी पोलीस वाहन घटनास्थळी तत्परतेने पोहोचण्यासाठी दुरुस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पथ्रोट पोलीस ठाण्याचे चारचाकी वाहनाच्या हेडलाईटपैकी एक दिवा फुटला व बंद अवस्थेत आहे. परिसरात एखादी मोठी घटना घडल्यास तेथे पोहोचण्यापूर्वी वाहन सुरू करण्याकरिता कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ते सुरू करण्याच्या पोलिसांच्या खटपटी पाहून पथ्रोटवासीयच अनेकदा वाहनाला धक्का देण्याकरिता मदत करतात, हे वास्तव आहे.
पथ्रोट पोलीस ठाण्याची भव्यदिव्य नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ठाण्याचा आवाकाही मोठा आहे. त्यानुसार वाहने उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे.