पाटी ‘कोरी’, उद्ध्वस्त आयुष्याला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:01:00+5:30

विकासात आदिवासी मुले कुठे आहेत, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कामाच्या निमित्ताने स्थलांतरित मेळघाटातील आदिवासी बांधवांची मुले हे वीटभट्ट्यांवर काम करीत आहे. अमरावतीला लगतच्या कोेंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावर  ५० ते ६०  वीटभट्ट्या असून या परिसरात शेकडो आदिवासी मुले बाल मजूर म्हणून राबताहेत. त्यामुळे ही मुले  शिक्षण, हक्क, अधिकारांपासून वंचित  असून त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Pati ‘Cory’, who is responsible for the ruined life? | पाटी ‘कोरी’, उद्ध्वस्त आयुष्याला जबाबदार कोण ?

पाटी ‘कोरी’, उद्ध्वस्त आयुष्याला जबाबदार कोण ?

Next

उज्वल भालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या वयात हाती पाटी असावी, अक्षरे गिरवावी, नेमके त्याच वयात आदिवासी मुलांच्या नशिबी फार वेगळे चित्र आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातून स्थलांतरित आदिवासी कुटुंब अमरावती शहरासह लगतच्या वीटभट्ट्यांवर मुलांसह कष्ट करीत असल्याचे विदारक दृश्य आहे. त्यामुळे आदिवासी मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या उद्ध्वस्त भविष्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
देशाचे भविष्य हे येणाऱ्या नव्या पिढीच्या हाती असून देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. अशा ‘ राजकीय’ भूलथापा नित्याचीच बाब आहे. मात्र, या विकासात आदिवासी मुले कुठे आहेत, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कामाच्या निमित्ताने स्थलांतरित मेळघाटातील आदिवासी बांधवांची मुले हे वीटभट्ट्यांवर काम करीत आहे. अमरावतीला लगतच्या कोेंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावर  ५० ते ६०  वीटभट्ट्या असून या परिसरात शेकडो आदिवासी मुले बाल मजूर म्हणून राबताहेत. त्यामुळे ही मुले  शिक्षण, हक्क, अधिकारांपासून वंचित  असून त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रोजगार नसल्याने स्थलांतर
मेळघाटात रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसल्याने अनेक आदिवासी हे कुटुंबासह वास्तव्यास राहतात. कोंंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावरील वीटभट्ट्यांवर अनेक आदिवासी कुटुंब काम करीत आहे. ही संख्या हजारात आहेत. यात काही आदिवासी महिला गर्भवती तर काही स्तनदा माता देखील आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.  

मेळघाटातील आरोग्य सेवा पुरवणे कठीण 
मेळघाटात आदिवासी बांधवांकरिता अनेक आरोग्य योजना राबविल्या जातात. या योजना मेळघाटातील स्थलांतरित आदिवासींसाठी राबविणे कठीण होते. सध्या वीटभट्टी परिसरात असलेल्या गर्भवती, स्तनदा माता तसेच बालकांचा संदर्भात अंजनगाव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

५२० लाभार्थींपर्यंत पोहचविला लाभ
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अमरावती ग्रामीण विभागांतर्गत वीटभट्टी परिसरातील ५२० लाभार्थींपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्यात आला. यामध्ये तीन वर्षांखालील २०७, सहा वर्षांखालील २७५ मुले तसेच ३८ गरोदर व स्तनदा माता आहेत. यात गहू, हरभरा, मूग डाळ, साखर, हळद, मिरची, मीठ असे किराणा साहित्याचा समावेश आहे.
- विलास दुर्गे, बाल विकास प्रकल्प अधिकारी

दोन बालकामगार रोखले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बालकामगार विरोधी धाडसत्र राबविण्यात आले नाही. गतवर्षी जिल्ह्यात एकूण पाच धाडसत्र राबविले. यामध्ये तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली. कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्ट्यांवर दोन बालकामगारांचे शोषण रोखून योग्य ती कारवाई केली आहे. बालकामगार असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करू. 
- राहुल काळे, सरकारी कामगार अधिकारी

 

Web Title: Pati ‘Cory’, who is responsible for the ruined life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.