रेफर करताना रुग्ण दगावला; नातेवाइकांनी केली रुग्णवाहिकेची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 07:32 PM2023-03-27T19:32:41+5:302023-03-27T19:33:14+5:30

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील अतिदक्षता विभागातून नागपूरला रेफर करण्यात आलेल्या रुग्णाचा खासगी रुग्णवाहिकेत टाकताच मृत्यू झाला. या खासगी रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर बंद असल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली.

Patient died while referring; Relatives vandalized the ambulance | रेफर करताना रुग्ण दगावला; नातेवाइकांनी केली रुग्णवाहिकेची तोडफोड

रेफर करताना रुग्ण दगावला; नातेवाइकांनी केली रुग्णवाहिकेची तोडफोड

googlenewsNext

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील अतिदक्षता विभागातून नागपूरला रेफर करण्यात आलेल्या रुग्णाचा खासगी रुग्णवाहिकेत टाकताच मृत्यू झाला. या खासगी रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर बंद असल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली. यावेळी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय परिसरात निर्माण झालेला तणाव लक्षात घेता तातडीने पोलिसांना पाचारण केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. नंदकिशोर काठोळे (वय २४) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला येथील रहिवासी नंदकिशोर काठोळे या युवकाने २० मार्च रोजी विष प्राशन केले होते. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. नंदकिशोरची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याच दिवशी त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविले होते. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नंदकिशोरच्या पूर्ण शरीरात विषबाधा झाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला. त्यामुळे सोमवारी त्याला नागपूरला हलविण्यासाठी नातेवाइकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावली होती. यावेळी नंदकिशोरला रुग्णवाहिकेत टाकताच त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर बंद असल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णवाहिकेच्या काचांवर दगड मारून तोडफोड केल्याची माहिती काही प्रत्ययदर्शींनी दिली. यावेळी रुग्णालय परिसरात तणाव निर्माण होताच रुग्णालय प्रशासनाने सदर घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिस ठाण्याला देत पोलिसांना पाचारण केले होते.

 

कारला येथील नंदकिशोर काठोळे नामक युवक हा २० मार्चपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती होता. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरला रेफर करण्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी खासगी रुग्णवाहिका त्याला घेण्यासाठी आली होती. परंतु, रुग्णवाहिकेत टाकताच त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाइकांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली. रुग्णालयात निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता पोलिसांना बोलाविण्यात आले होते.
-डॉ. नरेंद्र सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी, इर्विन.

Web Title: Patient died while referring; Relatives vandalized the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.